गरजूंच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद !

प्रा.भगवान जगदाळे
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह स्मृती- जवाहरलाल वाचनालयातर्फे दिवाळीनिमित्त परिसरातील गोरगरीब, गरजूंना मोफत वस्त्रवाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते गरीब व गरजूंना वस्त्रवाटप झाले. संचालक मंडळाच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह स्मृती- जवाहरलाल वाचनालयातर्फे दिवाळीनिमित्त परिसरातील गोरगरीब, गरजूंना मोफत वस्त्रवाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते गरीब व गरजूंना वस्त्रवाटप झाले. संचालक मंडळाच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

सुरुवातीला वाचनालयातर्फे ग्रामस्थांना सुस्थितीतील कपडे व साड्या आदी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संचालक मंडळासह ग्रामस्थांनी सुमारे 90 ड्रेस (पँट-शर्ट) व 40 साड्या संकलित करून वाचनालयात जमा केले. ते सुस्थितीतील कपडे ईस्त्री करुन गरजूंना वाटप करण्यात आले. याबाबत सोशल मिडियासह संचालक मंडळामार्फत ताबडतोब गरजू, ग्रामस्थांना निरोप देण्यात आला. अवघ्या काही तासांतच सर्व वस्त्रांचे वितरण झाले. यावेळी संचालक संजय शाह, कपिल शाह, मनोहर राणे, शैलेंद्र शाह यांच्यासह कर्मचारी वृंद, वाचक आदी उपस्थित होते.

दरम्यान दिवाळी अंक योजनेचेही यावेळी उदघाटन करण्यात आले. वाचकांसाठी खास करून बालक, किशोर, युवक-युवती, महिला, किशोर, बालकांसाठी बालसाहित्य, मनोरंनपर, प्रबोधनपर साहित्य, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, स्त्रियांसाठी उपयुक्त वाचन साहित्य आदीही उपलब्ध करून देण्यात आले. वाचनप्रेरणेसह सामाजिक बांधिलकीतून वाचनालयातर्फे राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे...

"सर्वसामान्यांना परिस्थितीमुळे दिवाळीला नवे कपडे घेऊन सण साजरा करणे शक्य होत नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी वाचनालयातर्फे हा विशेष उपक्रम राबविण्यात आला."- नयनकुमार अजितचंद्र शाह

Web Title: Deepavali blossom on the face of the needy