आज उधार कल नगद... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

उधारी व सुट्या पैशांच्या अभावामुळे किराणा दुकान व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे लवकराच परिस्थिती नियत्रंणात येणे आवश्‍यक आहे. 
- नरेश बालचंदानी, दुकानदार 

जुने नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयामुळे किराणा दुकानांमध्ये इतर वेळी "आज नगद, कल उधार'चे दिसणारे फलक बऱ्याच प्रमाणात नाहीसे झाले आहेत. त्यांच्या जागी लवकरच "आज उधार, कल नगद'चे फलक लावण्याची वेळ येणार की काय, अशी भीती दुकानदारांना वाटू लागली आहे. 

भ्रष्टाचाऱ्यांकडे असलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयामुळे सर्वाधिक सामान्य नागरिकच भरडले जात आहेत. हातावर काम करणाऱ्यांसह मध्यमवर्गीयांवर या निर्णयाचा जास्त परिणाम झाला आहे. किराणा खरेदी करण्यासाठीचे सुटे पैसेसुद्धा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना किराणा दुकानदारांकडून उधारीवर माल घ्यावा लागत आहे. महिनाअखेरीस या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. किरकोळ किराणाही दुकानदारांकडून उधार घ्यावा लागत आहे. नेहमीच्या संबंधामुळे दुकानदारही त्याना नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे उधारीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. इतर वेळेच्या तुलनेत या महिन्यात अधिक उधारीचे खाते झाल्याची माहिती दुकानदारांकडून देण्यात आली आहे. उधार दिले नाही, तर ग्राहक तुटण्यासह संबंध खराब होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे उधार देणे भागच पडत आहे. भांडवल जास्त प्रमाणात अडकून पडले आहे. येणाऱ्या काही दिवसांत व्यवहार सुरळीत होतील. झालेली उधारी येईल; पण आजचे काय? आज तर आम्हाला नोटाबंदीच्या निर्णयामुळे बिकट परिस्थितीला सामोरे तर जावेच लागत आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांवर उधारी शिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही. 

इकडे आड, तिकडे विहीर 
उधार दिले नाही तर संबंध बिघडण्यासह ग्राहक तुटण्याची वेळ, उधार दिले तर पूर्ण उधारी मिळेल की नाही. याचा विचार न करता खिशातील पैसे टाकून व्यवसाय करण्याची वेळ आल्याने "इकडे आड, तिकडे विहीर' अशी परिस्थिती सध्या किराणा दुकानदारांची झाली आहे.

 

Web Title: Demonetisation : effects on rural Indian economy