शेतकरी संपन्न करण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नाशिक - शाश्‍वत शेती व तिच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक ही साखळी स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासोबतच शेतकरी सुखी व संपन्न करण्याचा निर्धार करीत दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेची रविवारी (ता.६) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सांगता झाली. 

नाशिक - शाश्‍वत शेती व तिच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक ही साखळी स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासोबतच शेतकरी सुखी व संपन्न करण्याचा निर्धार करीत दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेची रविवारी (ता.६) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सांगता झाली. 

"अन्नसुरक्षेच्या माध्यमातून फलोत्पादन'' हे घोषवाक्‍य असलेल्या ‘सकाळ-ॲग्रोवन’ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यातर्फे दुसरी राष्ट्रीय राष्ट्रीय फलोत्पादन परिषद झाली. या परिषदेत काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व अन्नसुरक्षा या विषयांवर चार सत्रांमधून देशभरातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी व प्रयोगशील शेतकऱ्यांनी विचारमंथन केले. राज्यभरातून निमंत्रित केलेल्या बाराशे शेतकऱ्यांनी या परिषदेत वक्‍त्यांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिषदेच्या समारोपप्रसंगी शेतकरी, अधिकारी व तज्ज्ञांनी एकत्रितपणे तयार केलेला जाहीरनामा वाचून दाखविण्यात आला. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी जाहीरनाम्याचे 
वाचन केले. समारोपप्रसंगी ‘आत्मा’चे नाशिक येथील प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे, कृषी अधिकारी गोविंद हांडे, जयंत देसाई, हेमंत धात्रक आदी उपस्थित होते.

महापरिषदेचा जाहीरनामा
फलोत्पादनातील सर्व उत्पादक, बागायतदार शेतकऱ्यांनी फलोत्पादन परिषदेच्या निमित्ताने भारतीय; तसेच विदेशातील ग्राहक ते सरकारी व प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित घटकांना उद्देशून जाहीरनामा जाहीर केला.
मानवीय दृष्टिकोनातून सुरक्षित व जागतिक बाजारपेठेच्या निकषानुसार विषमुक्त उत्पादन घेऊ. 
शाश्‍वत शेती व तिच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक ही साखळी स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविणे, शेतकरी सुखी व संपन्न करणे हे ध्येय. 
एकमेकांच्या हातात हात घालून समृद्ध बनविण्यानाचा सामूहिक निर्धार.

‘साम’वर आज ‘आवाज महाराष्ट्राचा’
‘सकाळ - ॲग्रोवन’ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नाशिक येथे दोन दिवस झालेल्या राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेच्या समारोपावर आधारित ‘आवाज महाराष्ट्राचा’ हा विशेष कार्यक्रम उद्या (ता. ७) रात्री आठ ते नऊ यावेळेत ‘साम’ मराठी वाहिनीवरून प्रसारित होईल. तसेच, या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण मंगळवारी (ता. ८) सकाळी दहा ते अकरा या वेळेत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Determination to rich farmers by national Horticultural council