कावड घेऊन भाविक निघाले सप्तश्रृंग गडावर...

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आदिशशक्ती सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाल्यानंतर भाविकांना आता रविवारी होणाऱ्या कावड यात्रेची आस लागली आहे. वणी गडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा उत्सव (कावड यात्रा) होतो. या यात्रेसाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. यात्रेतही पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांवर असते. विविध ठिकाणांहून चारशे ते सहाशे किलोमीटर अंतरावरून अनवाणी प्रवास करून गडापासून भाविक वणी गडाकडे मार्गस्थ झाले आहेत.

वणी : राज्यातील सर्वांत मोठी कावड यात्रा व देशातील तृतीय पंथीयाची छबीना मिरवणूक रविवारी (ता. १३) स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर निघणार आहे. राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत. 

 यात्रेसाठी दिवसेंदिवस गर्दीत वाढ

आदिशशक्ती सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाल्यानंतर भाविकांना आता रविवारी होणाऱ्या कावड यात्रेची आस लागली आहे. वणी गडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा उत्सव (कावड यात्रा) होतो. या यात्रेसाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. यात्रेतही पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांवर असते. त्यात हजारो कावडीधारक पुणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोदा या ठिकाणाहून तापीचे, ओंकारेश्‍वर, इंदूर येथून नर्मदेचे, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ आदी ठिकाणांहून चारशे ते सहाशे किलोमीटर अंतरावरून अनवाणी प्रवास करून गडापासून सुमारे दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत दाखल झाले आहेत.

दहा हजार कावडीधारक त्र्यंबकेश्‍वरहून वणी गडाकडे मार्गस्थ 

दिंडोरी तालुक्‍यासह जिल्हाभरातून सुमारे दहा हजारांवर कावडीधारक रात्री उशीरापर्यंत त्र्यंबकेश्‍वर येथे रवाना झाले होते. ते आता वणी गडाकडे मार्गस्थ झाले आहेत. शेगाव ते त्र्यंबकेश्‍वर व त्र्यंबकेश्‍वर ते वणी असा पंचवीस दिवसांचा अनवाणी कावड घेऊन शेगाव येथील मनोज डोंगरे पहिली कावड घेऊन वणीत येथे दाखल झाले आहेत. मनोज डोंगरे यांनी कावडीचा एक गडवा शेगाववरून, तर दुसरा गडवा त्र्यंबकेश्‍वर येथून भरून आणला आहे. त्याचे वणी येथे सप्तशृंगी देवी ट्रस्टचे विश्‍वस्त गणेश देशमुख यांनी स्वागत केले. 

प्रशासकीय यंत्रणा कावड यात्रेसाठी सज्ज 
नवरात्रोत्सवादरम्यान कार्यरत असलेली प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगीदेवी न्यास व ग्रामपंचायतीची यंत्रणा कावड यात्रेसाठी सज्ज झाली आहे. रविवारी नांदुरी- सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. महामंडळानेही नवरात्राप्रमाणेच नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान ५० बस, तर नाशिक विभागातील ११ आगारातून सुमारे ३०० बसद्वारे भाविकांच्या वाहतुकीचे नियोजन केले आहे. सप्तशृंगगडावर येणाऱ्या कावडीधारक व पदयात्रेकरूंना विसावा, पिण्याचे पाणी व फराळ वाटपाबरोबरच वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नाशिक ते वणी, मालेगाव, पिंपळनेर, सटाणा, कळवण रस्त्यांवर अनेक स्वयंसेवी संस्थांनी तयारी सुरू केली आहे. 

कोजागीरी पौर्णिमेनिमित्त होणारे विधी 
शनिवारी (ता. १२) रात्री कोजागिरी पौर्णिमा उत्सावास प्रारंभ होईल. रविवारी (ता. १३) सकाळी सातला पंचामृत महापूजा व दुपारी साडेबारा ते रात्री आठपर्यंत कावडीधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाईल. रात्री ९ ते बारापर्यंत भगवतीचा जलाभिषेक पंचामृत महापूजा होईल. सोमवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातला शांतीपाठ होऊन महाप्रसाद वाटपाने कोजागिरी उत्सवाची सांगता होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees leave for kawad on the vani