'या' साठी शनिवारी गोदाकाठावर होणार गर्दी.... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नाशिक : गेल्या 14 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या पितृपक्षाची शनिवारी (ता. २८ ) सांगता होणार आहे. यावर्षी सर्वपित्री अमावस्या शनिवारी आल्याने सर्वपित्री आणि शनी अमावस्येचा दुहेरी योग यावर्षी आला आहे. त्यामुळे शनिवारी श्राद्धविधी करण्यासाठी भाविकांची गोदाकाठावर गर्दी होण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक : पितृ पंधरवड्यात दरवर्षी गोदाकाठावर देशभरातून तसेच भारतातून परदेशात गेलेले देखील श्राद्धविधीसाठी भारतात येत असतात. त्यामुळे या पंधरा दिवसात गोदाकाठावर भाविकांची श्राद्धासाठी गर्दी असते. पितृपक्षाची सांगता शनिवारी (ता. 28) सर्वपित्री अमावस्येला होणार आहे. सर्वपित्री आणि शनी अमावस्येचा दुहेरी योग यावर्षी आला आहे. त्यामुळे शनिवारी श्राद्धविधी करण्यासाठी भाविकांची गोदाकाठावर गर्दी होण्याची शक्‍यता आहे. या दिवशी ज्यांना आपल्या श्राद्धाची तिथी माहिती नसते किंवा ज्यांची तिथी चुकली आहे ते या दिवशी श्राद्ध करत असतात. त्यामुळे शेवटच्या दिवशी पिंडदानासाठी जास्त गर्दी होत असते.

शनिवारी पुराच्या पाण्यामुळे गैरसोय होण्याची शक्‍यता

सर्वपित्री अमावस्येनिमित्त दरवर्षी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश यासह देशातील इतर राज्यातूनही भाविक श्राद्धविधीसाठी रामकुंड येथे येत असतात. त्यामुळे परराज्यातून शनिवारी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्‍यता आहे. गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत  वाढ झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजसारखाच पाऊस जर कायम राहिला तर शनिवारी पाण्यामुळे गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. 

प्रतिक्रिया 
पंधरा दिवस आपल्या शास्त्राप्रमाणे पितृपक्षात श्राद्धकर्म केले जाते. जसे आपण वर्षभर देवकार्य करतो तसे या पंधरा दिवसांत पितृकार्य केले जाते. ज्यांना आपल्या श्राद्धाची तिथी माहिती नसते ते या दिवशी पिंडदान करतात. तसेच जर कुणाची तिथी चुकली असेल तर तेही या दिवशी श्राद्धकर्म करतात. 
- चंद्रशेखर पंचाक्षरी, पुरोहित संघ, पंचवटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees may be crowded on the river Godawari on saturday