आमदारास लाच देणारा 'डेप्युटी सीईओ' अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

धुळे - लाच दिल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना अटक करताना "लाचलुचपत'चे पथक.

धुळे - लाच दिल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना अटक करताना "लाचलुचपत'चे पथक.

धुळे - पंचायत राज समितीचे सदस्य आणि नांदेडचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी आज सायंकाळी धुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना दीड लाखांच्या लाचप्रकरणी पकडून दिल्याने खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित अधिकाऱ्यास अटक केली.

पंचायत राज समिती तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यात 23 पैकी राज्यातील ठिकठिकाणचे 16 सदस्य आमदार सहभागी झाले आहेत. समितीप्रमुख आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा परिषदेत दुपारी कामकाज आटोपल्यानंतर संबंधित सदस्य आमदार शहरातील हॉटेल झंकार पॅलेसमधील मुक्कामाच्या ठिकाणी परतले. अशात सायंकाळी साडेपाचला आमदार पाटील यांना दीड लाखांची लाच देताना जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यास ताब्यात घेतल्याची वार्ता पसरली.

"प्रेमाची भेट' पडली महागात
आमदार पाटील व सहकाऱ्यांनी माळी यांना पकडून ठेवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक हॉटेलमध्ये पोचले. त्यांनी माळी यांना ताब्यात घेतले. आठवड्यापूर्वी माळी येथील जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. आमदार पाटील यांनीच "लाचलुचपत'कडे तक्रार केल्यावर ही कारवाई झाली. आमदार पाटील यांना "प्रेमाची भेट' देण्याचा प्रकार अधिकारी माळी यांना चांगलाच महागात पडला आहे.

चौकशी टळावी म्हणून...
पंचायत राज समितीमधील सदस्यांना "पाकीट' पोहोचविण्याची संस्कृती जोपासली जात असल्याची चर्चा राज्यात आहे. अधिकाऱ्यांची चौकशी लावू नये, निलंबित करू नये, यासाठी "पाकिटे' दिली जातात. धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारात गैरप्रकार, अनियमितता आढळल्याने चौकशीसह कारवाई टळावी म्हणून आमदार पाटील यांना दीड लाखांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: dhule news deputy ceo tushar mali arrested