धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ; अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास

तुषार देवरे
शनिवार, 1 जुलै 2017

अध्यापक शिक्षण पदविका (डीएड) अभ्यासक्रमासाठी एकेकाळी अर्ज मिळणे देखील दिव्य असणाऱ्या धुळे जिल्ह्यात आता अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

धुळे - अध्यापक शिक्षण पदविका (डीएड) अभ्यासक्रमासाठी एकेकाळी अर्ज मिळणे देखील दिव्य असणाऱ्या धुळे जिल्ह्यात आता अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

धुळे जिल्ह्यात एकेकाळी डीएडच्या प्रवेश अर्जासाठी संघर्ष करावा लागत होता. नंतर तो व्यवस्थित भरून दाखल करण्यासाठीही कसरत करावी लागत होती. एवढे करूनही प्रवेशात क्रमांक लागतो की नाही, याची धास्ती होती. मात्र गुरूजी बनविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात 2 हजार 160 जागांपैकी केवळ 114 अर्ज मान्य झाले आहेत. डीएड अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यंदाच्या डीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची शुक्रवारी अखेरची तारीख होती. आज (शनिवार) सहा वाजेपर्यंत अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शासकीय कोट्याच्या मराठी माध्यमासाठी 1 हजार 580 जागा आहेत. व्यवस्थापन कोट्यातील मराठी माध्यमासाठी 530 तर उर्दू माध्यमाच्या 50 अशा एकूण 2 हजार 160 जागा आहेत. केवळ धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात डीएडचा पसंतीक्रम घसरल्याचे चित्र आहे. राज्यातील 14 हजार डीएड विद्यालयांमधील 90 हजारच्या आसपास जागांच्या प्रवेशासाठी कोणी विचारणा देखील करत नसल्याची परिस्थिती आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये डीएडबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे.

नोकरीसाठी संघर्ष हेच निरुत्साहाचे कारण
डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी गुरूजी बनतात. मात्र नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा "सीईटी' देणे अनिवार्य असते. दरम्यान सीईटी भरती प्रक्रियेवेळी संस्थाचालकांची अपेक्षापूर्ती करताना होणारी दमछाक होते. अशा काही कारणांमुळे विद्यार्थी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवू लागल्याचे मानले जात आहे. संस्थांमध्ये वशिला व पैसा नसल्याने डिग्री घेऊनही फायदा नसल्याने फक्त लग्न पत्रिकेत डीएड मिरवण्यासाठीच पदवी घेऊन काय फायदा, अशी खिल्ली उडविली जात असल्याचे डीएडकडे पाठ फिरविण्यात येत आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य काही अभ्यासक्रमांकडे आकर्षित होत असल्याने ते गुरूजी बनण्यास नाखूष दिसत आहे.

नोकऱ्यांची कमतरता
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मागील दहा वर्षात दरवर्षी 80 हजारांच्या आसपास विद्यार्थी डीएडची पदविका घेऊन बाहेर पडले आहेत. पण त्या तुलनेत नोकऱ्या उपलब्ध झालेल्या नाहीत. गेल्या सात-आठ वर्षात शासनामार्फत शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही.

डीएड विद्यालयांच्या वाट्याला वनवास
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत बारावी कला, वाणिज्य, विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा अध्यापक शिक्षण पदविका डीएड अभ्यासक्रम चालविला जातो. अल्प काळातील कोर्स, उत्तम वेतन यामुळे अनेक वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे शहरी-ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता. शासकीय संस्थांची भरती प्रक्रिया प्रवेश परीक्षेद्वारे करण्यात आली. त्यातच गत दोन वर्षांत या प्रवेश परीक्षाही झाल्या नाहीत. झाल्यात त्यांचा निकालही अत्यल्प असल्याने संधी देखील हिरावल्या जात असल्याने यासह अन्य काही कारणांमुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जागांच्या तुलनेत केवळ चार ते पाच टक्के प्रवेश होण्याची शक्‍यता विद्यालये सांगत आहेत. नाशिक विभागातील 180 च्या आसपास अध्यापक विद्यालयांतील सहा हजार 654 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारच मिळत नसल्याने अध्यापक महाविद्यालयानवर संक्रांत कोसळली आहे.

आतापर्यंत 114 अर्ज मान्य केले आहेत. विद्यार्थ्यांचा ओढा मेडिकल, इंजिनिअरींगसह इतर क्षेत्राकडे ओढा असल्याचे दिसते. तेथे नंबर लागला नाही तर इकडे प्रवेश प्रकिया वाढण्याची अधिक शक्‍यता आहे. तुलनेत प्रतिसाद कमी मिळत आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन प्रवेश घ्यावा.
- डॉ. विद्या पाटील, प्राचार्या, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, (डाएट) धुळे

Web Title: dhule news marathi news ded college no admission maharashtra news