esakal | धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे
sakal

बोलून बातमी शोधा

दुष्काळावर मात करीत, कमी खर्चात तयार केले मोटरसायकल चे कोळपे

लोखंडी कोळपे बनविण्यासाठी दोन हजार पाचशे रूपये खर्च येतो. सव्वाफूटाचे दोन कोळपे कोळपण्यासाठी दोन माणसे लागतात. औत दररोज भाड्याने घेतले तर 1400 रूपये खर्च येतो. मात्र मोटरसायकलच्या कोळप्यामुळे केवळ दीडशे ते दोनशे पेट्रोल खर्च येतो. तुलनेत परवडणारे कोळपे कावठीच्या शेतकऱ्यांची पसंती ठरली आहे.

धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे

sakal_logo
By
तुषार देवरे

धुळे- वाढलेली महागाई, शेतीमालाल मिळणारा कमी भाव, जनावरांच्या वाढलेल्या किंमती या सर्व आव्हानांवर मात करत शेती करणे दिवसेंदिवस जिकीरीचे ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर धुळे जिल्ह्यातील कावठी येथील प्रगतीशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कल्पकता वापरून कमी खर्चात मोटारसायकलवर चालणार कपाशीचे कोळपे तयार केले आहे. कमी खर्चात कोळपणी होत असल्याने या कल्पक कोळप्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील कावठी (ता.धुळे) येथील प्रगतीशील शेतकरी भास्कर शांताराम पाटील (भडगावकर) आणि युवा मिस्तरी, नितिन तानकू सोनवणे यांनी एकत्रित येऊन मोटारसायकलवर चालणारे कोळपे तयार केले आहे. दोन दिवसात तयार करण्यात आलेल्या या आधुनिक पद्धतीने बनविलेल्या कोळप्यामुळे बैलजोडीच्या खर्चाची बचत, कमीत कमी मनुष्यबळात कोळपणी व तुलनेते कमी वेळात कोळपणी पूर्ण या त्रिसूत्रीचा लाभ होत आहे. हे हायड्रोलिक पद्धतीचे कोळपे कुठल्याही मोटरसायकलला जोडून सुरू करता येऊ शकते. तशी त्याची खोल फिटींग करून जोडता येते. तशी साधी, सोपी आणि सहज रचना करण्यात आली आहे. सुरुवातील प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेले हे कोळपे चाचणीत यशस्वी ठरल्याने त्याचा शेतात प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. कावठीच्या शेतकऱ्यांसाठी हे कोळपे म्हणजे अभिमानास्पद बाब ठरली आहे. या आधुनिक कोळप्याबाबत बोलताना शेतकरी पाटील यांनी सांगितले की, या कोळप्यामुळे आतापर्यंत दोन बिघे कपाशी कोळपणी झाली आहे. उर्वरीत सहा बिघे कपाशी कोळपणीचे काम सुरू आहे. तुलनेत बैलजोडीपेक्षा मोटरसायकलवर लवकर कोळपणी केली जात आहे. लोखंडी अथवा लाकडी कोळप्यापेक्षा हे कोळपे अधिक फायदेशीर आहे. हे कोळपे तयार करण्यासाठी कावठे गावातील युवा शेतकरी सोनु जाधव, समाधान शिंदे, भरत नेरकर, स्वानिल पाटील, मंहेद्र शिंदे, सुरेश मोरे, गणेश शिंदे, विकास देवरे, विनोद मोरे आदींचे सहकार्य लाभले आहे.

कोळप्याचे वैशिष्ट्ये

  • हायड्रोलिकचा वापरामुळे सहज कोणत्याही मोटरसायकलला जोडणी करणे शक्‍य
  • शॉकप्सर बसविल्याने कोळपणी करताना दगड, त्रासदायक काडी कचरा, कोळप्याला लागला तर मोटरसायकला तीव्र झटका लागून बॅलन्स जाणार नाही.
  • कपाशीच्या अंतरानुसार कोळप्यात दोन फूटापासून चार फूटांपर्यंत अंतर कमी-जास्त करण्याची सोय
  • उच्च दर्जाची क्षमता असल्याने झाडाजवळील सर्व तण निघून जाते.
  • एकच माणूस शेत कोळपू शकतो.
  • कोळपे बनविण्यासाठी बाजार भावानुसार केवळ तीन हजार रूपये खर्च
  • बाळगण्यास किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येते

लोखंडी कोळप्याच्या तुलनेत फायदेशीर
लोखंडी कोळपे बनविण्यासाठी दोन हजार पाचशे रूपये खर्च येतो. सव्वाफूटाचे दोन कोळपे कोळपण्यासाठी दोन माणसे लागतात. औत दररोज भाड्याने घेतले तर 1400 रूपये खर्च येतो. मात्र मोटरसायकलच्या कोळप्यामुळे केवळ दीडशे ते दोनशे पेट्रोल खर्च येतो. तुलनेत परवडणारे कोळपे कावठीच्या शेतकऱ्यांची पसंती ठरली आहे.

दुष्काळी परिस्थिती, मजुरीचा वाढता खर्च, कोळपणीसाठी लागणारा अधिक वेळ, महागडी बैलजोडी, न परवडणारे बैलजोडीचे भाडे या सर्व बाबींमुळे कोळपणीसाठी मोठा खर्च होतो.त्यामुळे मोटरसायकलवर आधारीत कोळपे तयार केले.
- भास्कर शांताराम पाटील (भडगावकर), प्रगतिशील शेतकरी, कावठी ता.धुळे.

शेतीसाठी उपयुक्त असे कोळपे तयार करण्यात यश आले. शेतकर्यांना कमी खर्चात हे कोळपे बनविताना माझ्या मित्रांचे मला सहकार्य लाभले आहे. यापुढे आधुनिक पद्धतीचे शेतीपयोगी अवजारे तयार करण्याचे नियोजन असल्याच्या प्रतिक्रिया प्रगतीशील शेतकरी नितिन तानकू सोनवणे, युवा मिस्तरी आणि नितिन तानकू सोनवणे यांनी व्यक्त केल्या.

loading image