नरडाणा रेल्वे स्थानक चकचकाट; स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने अडचणींचा सामना

एल. बी. चौधरी
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

सोनगीर (धुळे): नरडाणा येथे सर्वसोयींनीयुक्त रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले झाले असून, प्रवाशांत समाधान व्यक्त होत असले तरी सध्या रेल्वे स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने तसेच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, लवकरच अडचणी दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सोनगीर (धुळे): नरडाणा येथे सर्वसोयींनीयुक्त रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले झाले असून, प्रवाशांत समाधान व्यक्त होत असले तरी सध्या रेल्वे स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने तसेच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, लवकरच अडचणी दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुरत-भुसावळ या प्रमुख रेल्वेमार्गा दरम्यान उधना- जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणास गती आली असली तरी अद्याप शिंदखेडा ते नंदूरबार हे सुमारे 60 किलोमीटर अंतरातील लोहमार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. 2017 पर्यंत काम पुर्ण होऊन प्लेटफार्म व स्थानकाचा वापरास सुरूवात होईल ही अपेक्षा आधीच फोल ठरली आहे. किमान दिवाळीपर्यंत तरी काम पूर्ण होऊन वापरास सुरूवात व्हावी अशी अपेक्षा आहे. दरम्यान, प्रत्येक थांबावर नवीन रेल्वेस्थानक निर्माणचे काम पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. नरडाणा रेल्वेस्थानक चकचकाट झाले असून  सोयींनीयुक्त आहे. सध्या मात्र प्रवाशांना विशेषतः सुरत कडे जाणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

2008 मध्ये उधना जळगाव या 307 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणास मंजूरी मिळाली. त्यावेळी सातशे कोटी रूपये खर्चाचा अंदाज होता. मात्र रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद होत नव्हती. 2011 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली तोपर्यंत खर्च तिप्पट झाला. केवळ सातशे पन्नास कोटी रूपये मंजूर झाले. दरवर्षी अर्थसंकल्पात पुरेशी रक्कम मंजूर होत नसल्याने मंजूर निधीच्या प्रमाणात कासवगतीने  काम हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढतच आहे. सुरुवातीला अगदी मंदगतीने सुरू असलेले काम  2015 - 16 पर्यंत म्हणजे चार वर्षात 40-45 टक्के काम पुर्ण झाले. मात्र त्यानंतर कामाने वेग घेतला. जळगाव ते शिंदखेडा व नंदूरबार ते सुरत दरम्यान दुहेरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.  पुलांचे काम व  लेव्हलिंगचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. नरडाणाचे इंग्रज काळातील दक्षिणेकडील रेल्वेस्टेशन तोडून टाकण्यात आले. समोर विरूध्द बाजूला भव्य स्थानक बनविण्यात आले असून तेथे प्रतिक्षालयासह सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. नरडाणा स्टेशनवर आता चार प्लेटफार्म झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्लेटफार्माचा चेहरामोहरा बदलला आहे.

रेल्वे बालोद्यान
दुहेरीकरण होत असतांनाच अमळनेर व नंदूरबार रेल्वे स्टेशनला मॉडेल स्टेशनचा दर्जा देण्यात येत असून, अमळनेरला रेल्वे बालोद्यान तर नंदूरबारला नवीन प्रतिक्षालय होत आहे. मात्र संथ कामामुळे प्रवाशात नाराजी आहे. नंदुरबार ते जळगाव दरम्यान बहूतांश रेल्वेस्थानकातील अस्वच्छता दूर झाली आहे. शुध्द पिण्याचे पाण्याची कमतरता, शौचालय व स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य हे दृश्य बदलत आहे. हे प्रवाशांच्या दृष्टीकोनातून समाधानाची बाब आहे.

प्रवाशांचे हाल
नरडाणाच्या नवीन रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी नरडाणा गावातून थेट रस्ताच नाही. त्यामुळे सर्व वाहने जुने स्थानक होते तेथेच थांबतात. येथे भुसावळ व सुरत जाण्यासाठी वेगवेगळे फलाट असले तरी दोन्ही बाजूला तिकिटविक्री नसल्याने दादरा चढून विरुद्ध दिशेला जाऊन व तिकीट काढून सुरतला जायचे असेल तर पुन्हा दादरा चढून जुने स्थानकावरील फलाटावर येतात. वृध्दांना त्रासदायक आहे. त्यामुळे दादराचा कोणी वापर न करता धोका पत्करून सर्रास रूळ ओलांडतात. सध्या रेल्वे फलाट नसलेल्या मधल्या रुळावर सुरत जाणारी पॅसेंजर थांबत असल्याने प्रवाशांना हाल भोगावे लागत आहेत. वृध्दांना रेल्वेत चढणे व उतरणे कठीण व धोकेदायक झाले आहे. मात्र, पुढील आठवड्यात सुरत जाणारी पॅसेंजर फलाटावर थांबेल व दिवाळीपर्यंत जळगाव ते उधना दुहेरीकरण पूर्ण होऊन वापरात येईल अशी माहिती रेल्वे कर्मचारी वारुडे यांनी दिली.

Web Title: dhule news nardana railway station issue