धुळे : 'याले काय श्रावण म्हणतस'; वृध्दांची खंत

no rain in dhule
no rain in dhule

कापडणे (जि.धुळे) : श्रावण महिना मध्यावर आला आहे. पावसाचे वातावरण आहे. पाऊस कोसळत नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. पिके ऊन्ह धरू लागली आहेत. श्रावणात नदी नाले दुथडी भरुन वाहत. विहिरींमधून हातभर दोरानेही पाणी काढले जायचे. श्रावणातील झडीने आबालवृध्द त्रस्त व्हायचेत. पूर्वीचा श्रावण इतिहास जमा झाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून श्रावणातले वातावरण भाद्रपदासम झाले आहे. पावसाअभावी ग्रामीण भागातले चैतन्यच हरपले आहे. बरस रे बरस मेघू राया अशी आराधना होवू लागली आहे. तर जुने जाणते वृध्द याले काय श्रावण म्हणतस ...आमीन देखेल श्रावण आते नावलेच रायले शे ; अशी खंत व्यक्त करीत जुन्या आठवणींमध्ये रमत आहेत.
     
श्रावणझडी
सत्तरच्या दशका पर्यंत श्रावण महिन्यातील झडीची करामतच वेगळी होती. पिकांची वाढ जोमाने सुरु असायची. श्रावणाचे अागमन व्हायचे. तोपर्यंत निंदणीची कामे आवरलेली असायची. एकदाची श्रावण झडी सुरु झाली म्हणजे घरातून बाहेर पडणेही मुश्कील व्हायचे. माती धाब्याची घरे गळू लागायची. घरभर पाणी पसरु नये. म्हणून ठिकठिकाणी भांडी ठेवलेली असायची. सातत्यपुर्ण सारख्या पावसाने लहानमुलांचीही मोठी कुंचबणा व्हायची. घरात थांबणे. आजीच्या मायेच्या पदरात झोपणे. गप्पा गोष्टी करणे यातच त्यांना टाईमपास करावा लागे. पाऊस थंडीने कापरे भरायचे. घरातच तगारीत शेकोटी पेटविणे. गोवर्‍या टाकून विस्तव धगधगता ठेवणे. सभोवतीला चारपाच भांवडांचे पुर्णच कुटुंब असायचे. गडी माणसे शेतावर जावून शेतीतील साचलेले पाणी काढण्यासाठी बांध फोडायचेत. एका शेतातील पाणी दुसर्‍या शेतात गेले म्हणून भांडणेही होणे अपरीहार्यच असायचे. अती पावसाने बाजरी , ज्वारी आदी पिके पिवळे पडायचीत. घरातील धान्यही संपुष्टात यायचे. नदी नाले दुथडी भरुन वाहत. नदीकाठच्या गावांना तर सावधानतेचा इशारा असायचा. रात्री पुन्हा पाऊस सुरु झाला म्हणजे वडीलधारी मंडळी रात्र जागून काढायचीत. पुरामुळे व गळत्या घरांमुळे त्यांचा डोळ्याला डोळा लागत नसायचा आदी आठवणी येथील शालिकराम जयराम पाटील, बळीराम चौधरी सांगतात.

गढीवरुन नदीच्या पूरात उड्या
येथील गढी भात नदीच्या किनारी आहे. बावीस फुट उंच आहे. भात नदीला श्रावणात महिनाभर पूर असायचा. आदिवासी तरुण गढीवरुन उड्या मारायचेत. ज्यास मत्स उडी असे संबोधले जायाचे. पोहत एका काठावरुन दुसर्‍या काठाकडे जायाचेत. हे चित्तथरारक पोहणे बघण्यासाठी सारा गावच गढीवर जमलेला असायचा. पूराचे पाणी गावाला वळसा घालून कौठळ रस्त्यालगतच्या नाल्यात जायाचे. आज नदीच्या पात्रात सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे राहिले आहे. त्यांच्या पायरीपर्यंतही नदीला पाणी गेलेले नाही. सर्वकाही इतिहास जमा झाले आहे.
     
दरम्यान बाजरी, ज्वारी, मका, कापूस आदी पिकांची पावसा अभावी वाढ खुंटली आहे. दोन चार दिवसांत जोमदार पाऊस न झाल्यास पुन्हा सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळाची छाया गडद होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com