‘गोलाणी’तून रोग फैलण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

जळगाव - गोलाणी व्यापारी संकुल रोग फैलावण्याच्या उंबरठ्यावर आहे. या ठिकाणी सफाईच होत नसल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. वरून सुंदर दिसणाऱ्या या संकुलात सर्वत्र घाण साचलेली आहे. या ठिकाणच्या रिकाम्या खोल्याही कचऱ्याने फुल्ल आहेत. त्यामुळे याच संकुलातून केवळ नवीपेठ नव्हे, तर जळगावात रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

जळगाव - गोलाणी व्यापारी संकुल रोग फैलावण्याच्या उंबरठ्यावर आहे. या ठिकाणी सफाईच होत नसल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. वरून सुंदर दिसणाऱ्या या संकुलात सर्वत्र घाण साचलेली आहे. या ठिकाणच्या रिकाम्या खोल्याही कचऱ्याने फुल्ल आहेत. त्यामुळे याच संकुलातून केवळ नवीपेठ नव्हे, तर जळगावात रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

निवडणुका आल्या म्हणजे ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर, हिरवेगार शहर’ असा नारा दिला जातो. रस्ते, गटारी, स्वच्छतेच्या सुविधा देऊ अशी हमी दिली जाते. अगदी संकुल नव्हे, तर तुमचे दुकानही चकाचक करून देऊ, असे उमेदवार सांगतात. परंतु निवडणुका संपल्यावर काय परिस्थिती असते ती गोलाणी व्यापारी संकुलातील दुकानदारांना तसेच या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना विचारण्याची गरज आहे. 

कुठेही बघा, कचराच कचरा
गोलाणी व्यापारी संकुलात पाय ठेवला, की कोणत्याही विंगमध्ये दिसेल तो कचरा आणि केवळ कचराच. या ठिकाणी प्रत्येक पायरीवर कचऱ्याचे ढीग आहेत, तर विंगमध्ये ठिकठिकाणी मोठमोठे उकिरडे झाले आहेत. या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाटच लागत नाही. त्यामुळे प्रत्येक कोपऱ्यात कचऱ्याचे मोठे ढीग लागले आहेत. विशेष म्हणजे ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. 

गाळ्यांमध्येही कचऱ्याचा साठा
गोलाणी संकुलात महापालिकेचे काही गाळे, हॉल रिक्त आहेत, त्याला कुलूप नाहीत. त्यामुळे या खोल्यांचा कचरा टाकण्यासाठी वापर करण्यात येत आहे. हे गाळे कचऱ्याने फुल्ल भरले आहेत. प्रत्येक मजल्यावर हीच अवस्था आहे. तर मीटररूमही कचऱ्याने फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे आता कचरा टाकण्यास जागाच नसल्याने आता कचरा रस्त्यावरच टाकण्यात येत असून संपूर्ण संकुलच कचऱ्याने भरले आहे.

सफाईची तातडीने गरज
गोलाणी व्यापारी संकुलात तातडीने साफसफाई करण्याची गरज आहे. महापौरांनी स्वतः पाहणी केल्यास त्यांना त्याचे गांभीर्य कळेल, त्यामुळे त्यांनी पाहणी करून आरोग्य विभागाला सफाईचे आदेश देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हे संकुल महापौरांच्याच प्रभागात आहे.  या उपाययोजनेला आता विलंब झाल्यास या ठिकाणाहून रोगराई फैलावल्यास ते आवरणे कठीण होण्याची शक्‍यता आहे.

नवीपेठेवर नव्हे, जळगाववर संकट
संकुलात सर्वत्र एवढा कचरा साचला आहे, की त्याचा आता ‘विस्फोट’ होण्याची स्थिती आहे. हे संकुल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. सर्वच ठिकाणी प्रचंड कचरा असल्याने त्यात मच्छर, डास मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या ठिकाणाहून रोगांचा फैलाव झाल्यास केवळ संकुल आणि नवीपेठेलाच नव्हे, तर संपूर्ण शहराला त्याचा धोका निर्माण होण्याची स्थिती आहे. महापालिकेने याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. 

महापालिकेचा ‘इगो’ अन्‌ जनतेला त्रास
गोलाणी व्यापारी संकुलात सफाई न होण्याची कारण म्हणजे केवळ महापालिकेच्या कराचा ‘इगो’ आहे. सेवा कर घेण्यावरून असलेल्या वादात महापालिकेने या ठिकाणची सफाईच बंद केली आहेत. आता दुकानदारांची त्याबाबत तयारी असतानाही महापालिकेचे अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. यामुळे मात्र या ठिकाणच्या दुकानदारांनाच नव्हे, तर या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत 
आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disease risk in golani commercial complex