शिळ्या अन्नामुळे श्‍वानांचा उच्छाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक - वर्षभरात महापालिकेतर्फे श्‍वान निर्बीजीकरण करताना ठराविक भागात श्‍वानांच्या वाढत्या संख्येवरही अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून बहुतांश ठिकाणी शिळे अन्न श्‍वानांना दिले जात असल्याने त्यातून श्‍वानांचा उच्छाद वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून श्‍वानांना अन्न दिले जात असले तरी त्यातून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत असल्याने त्याबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात खासगी संस्थेमार्फत श्‍वानांचे निर्बीजीकरण केले जाते. तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या डॉग व्हॅनद्वारे श्‍वान पकडून विल्होळी येथील प्रकल्पात निर्बीजीकरण केले जाते. निर्बीजीकरणानंतर ज्या भागातून श्‍वान पकडले जातात, त्याच भागात सोडले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. 

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत शहरातील आठ हजार ९९० श्‍वानांवर निर्बीजीकरण करण्यात आले. निर्बीजीकरणाचे नवीन कंत्राट देण्याची तयारी झाली आहे; परंतु विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कार्यारंभ आदेश देता येत नाही. त्यामुळे दीड महिन्यापासून पशुसंवर्धन विभागामार्फत सर्वेक्षण केले जात असून, श्‍वानांचा उच्छाद वाढण्याची कारणे शोधली आहेत. वर्षभराचा अनुभव व गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेले सर्वेक्षण लक्षात घेऊन शिळे अन्न रस्त्याच्या कडेला टाकण्याच्या प्रवृत्तीतून श्‍वान वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
विशेष म्हणजे सोसायटी, बंगले भागात अन्न टाकण्यामुळे याच भागात अधिक श्‍वान आढळून येतात. श्‍वानांना आयते अन्न मिळत असल्याने त्याच भागात भटकंती होत असल्याने त्यातून उच्छाद निर्माण होऊन नागरिकांना त्रास होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे श्‍वानांची नोंदणी
उघड्यावर अन्न न टाकता घंटागाडीमध्येच टाकल्यास त्याचे खतामध्ये रूपांतर होत असल्याने याबाबत प्रबोधन हाती घेतले जाणार आहे. त्याशिवाय शहरात श्‍वानांची नोंदणीदेखील बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी श्‍वान फिरायला घेऊन येणारे नागरिक, ज्या घरांवर कुत्र्यांपासून सावध राहा, असे फलक लावले आहेत, त्या घरांमध्ये महापालिकेचे कर्मचारी श्‍वान नोंदणी करून घेणार आहेत. त्याशिवाय पेट क्‍लिनिकमधूनही श्‍वान नोंदणी केली जाईल.

Web Title: dog leftover food