दुष्काळ उठला गुरांच्या जिवावर 

दीपक कच्छवा
शनिवार, 18 मे 2019

पशुधन विक्रीला 
उन्हाचा तडाखा वाढल्याने विहिरींना पाणी नाही, बोअरवेल आटल्या आहेत. त्यामुळे गुरांसाठी चारा व पाणी मिळणे कठीण झाले आहे. एकेकाळी साठ रुपये शेकडा असलेला कडबा चारा आज दुपट, तिपटीने विकला जात आहे. नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटवले आहे. आता चारा टंचाईचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. चाऱ्याअभावी गुरे सांभाळणे कठीण झाल्याने अनेकांनी आपली गुरे विक्रीला काढली आहेत. गावागावांतील तलाव, नदी, नाले व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना त्यांच्या गुरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत आहे. पाण्याअभावी चारा मिळेनासा झाला आहे, जो काही चारा आहे, तो महाग असल्याने गुरांना खाऊ घालणे पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता, शासनाने चारा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे. 

चाळीसगाव तालुक्यात चारा टंचाईने पशुपालक त्रस्त झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाने चारा बियाणे वाटले खरे मात्र पाण्याअभावी चाऱ्याचे उत्पादनच झाले नाही. दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा आणि उद्भवलेली दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, गाव पातळीवर शासनाच्या न पोचलेल्या विविध योजना अशा कारणांमुळे गुरांची संख्या घटत आहे. ग्रामीण भागात २०१२ च्या पशु गणनेनुसार गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या १ लाख ६५ हजार ८१९ आहे. पूर्वी बेरोजगारीवर मात करीत अनेकांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला. गुराख्यांकडे सांभाळण्यासाठी येणाऱ्या जनावरांची संख्या दीडशे ते दोनशे होती. गुराख्यांना रोजगार मिळायचा. चाऱ्याचे भाव सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे होते. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. 

चुकीचा अहवाल सादर 
चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगामात तालुका कृषी विभागाने चाऱ्यासाठी ९०० किलो बाजरीचे बियाणे रब्बी हंगामात दिले होते. त्यापासून सुमारे ३ हजार ६०० मेट्रिक टन चारा झाल्याची नोंद आहे. पशुसंवर्धन विभागाकडून चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामात ज्वारी, मका यासह इतर बियाणे वाटप केली. मात्र, त्यापासून किती चारा झाला याची नोंद या विभागाकडे उपलब्ध नाही. अशातच पशुसंवर्धन विभागाने शासनाला चुकीचा अहवाल देऊन तालुक्यात चारा टंचाई नसल्याचे कळवले आहे. परिणामी, तालुक्यात चारा छावणी सुरू होऊ शकली नाही. आतापर्यंत ज्या गिरणा परिसरात कधीही चारा टंचाई भासत नव्हती, त्या भागातही चारा मिळेनासा झाला आहे. पाण्याअभावी चारा म्हणून विकला जाणारा ऊस कमीत कमी २ हजार ३०० रुपये तर जास्तीत जास्त २ हजार ४०० रुपये टन दराने विकला जात आहे. उसाची बांडी व पाचटसह वजन केले जात असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत आहे. काहींनी तीन हजार रुपये दराचा भाव मिळेल, या आशेने ऊस विकला जाईल म्हणून उसाचे क्षेत्र राखून ठेवले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरूड, तरवाडेसह मालेगाव व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या हा चारा घेऊन जात आहेत. 

पशुधन विक्रीला 
उन्हाचा तडाखा वाढल्याने विहिरींना पाणी नाही, बोअरवेल आटल्या आहेत. त्यामुळे गुरांसाठी चारा व पाणी मिळणे कठीण झाले आहे. एकेकाळी साठ रुपये शेकडा असलेला कडबा चारा आज दुपट, तिपटीने विकला जात आहे. नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटवले आहे. आता चारा टंचाईचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. चाऱ्याअभावी गुरे सांभाळणे कठीण झाल्याने अनेकांनी आपली गुरे विक्रीला काढली आहेत. गावागावांतील तलाव, नदी, नाले व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना त्यांच्या गुरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

सर्वच प्रकारचा चारा खातोय भाव 
चाळीसगाव तालुक्यात यावर्षी चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाही चारा मिळणे कठीण झाले आहे. ज्वारीच्या शंभर पेंढ्या पाच हजार रुपये तर बाजरीच्या शंभर पेंढ्या साडेतीन हजारात मिळत आहे. त्यात वाहतूक खर्च वेगळा असल्याने हा चारा परवडेनासा झाला आहे. मका कुटीच्या एका आयशर गाडीसाठी २५ हजार तर सोयाबीन कुटीला २४ हजार रुपये मोजावे लागत आहे. दादरचा चारा एक हजार पेंढीला ३५ हजार रुपये झाला आहे. दूध वाढीसाठी उपयुक्त असलेल्या ढेपच्या एका पोत्याची किंमत १ हजार ८५० रुपये तर पन्नास किलोच्या सुग्रास कांडी व चुनीला प्रत्येकी १ हजार २०० रुपये मोजावे लागत आहे. एकूणच ही परिस्थिती लक्षात घेता, शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought affect on animals in Chalisgaon