‘जलयुक्त’मध्ये यश; मात्र टंचाईने त्रस्त

प्रशांत कोतकर
बुधवार, 22 मे 2019

सहा महिन्यांनंतर योजनेचे पाणी 
नांदगाव व चांदवड तालुक्‍यातील ४२ गावांची पाणीपुरवठा योजना आहे. त्यात या गावाचा समावेश आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी योजना समितीकडे हस्तांतर केली आहे. यात नांदगाव तालुक्‍याचा अध्यक्ष तर चांदवड तालुक्‍याचा उपाध्यक्ष आहे. यात सहा महिन्यांनंतर गावाला पहिल्यांदाच पाणी मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावाने योजनेसाठी हिस्सा भरला असताना गावाला पाणी मिळण्यासाठी याचना करावी लागत असल्याची खंत ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली.

वडगाव पंगू (जि. नाशिक) - गाव तस सधन. ग्रामविकासात उमद्या तरुणांची फळी. ‘जलयुक्त’ योजनेत गावाने कामांची विकास गंगा आणून ती पूर्णत्वास नेली. गावाने जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळविला. मात्र, वरुणराजाने व पाणी योजनेच्या अभावाने गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. 

नांदगाव तालुक्‍याच्या शिवजवळ असलेल्या वडगाव पंगू (ता. चांदवड) या गावाची लोकसंख्या दोन हजार. कुटुंबसंख्या ३७०. ७० टक्के कुटुंबांच्या घरी कूपनलिका आहेत. ४० टक्के कुटुंबातील किमान एकजण शासकीय नोकरीत आहे. (रेल्वे व अन्न महामंडळ). गावातील ग्रामपंचायत सदस्यात तरुणांची फळी असून त्यांच्यात गावासाठी काहीतरी करण्याची उमेद असल्याने गावही या युवकांच्या पाठिशी आहे. 

गावात ‘जलयुक्त’ची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. यामुळे गावाला जिल्ह्यात२०१६- १७ चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. पावसाने यावर्षी साथ न दिल्याने गाव व्याकूळ झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य विलास संसारे यांनी सांगितले. गावात खऱ्या अर्थाने फेब्रुवारीपासून तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावात टॅंकरने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचे ते म्हणाले.  

ग्रामस्थांचे स्थलांतर
दुष्काळामुळे २२ तरुण पुण्यात तर १०० च्या वर नागरिक रोज मनमाड व नाशिक येथे कामधंद्यासाठी जात आहेत. रोज मिळणाऱ्या रोजंदारीतून संसाराचे रहाटगाडे पुढे ओढण्याचे काम सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Water Shortage Vadgaon Pangu Village Jalyukta Shivar Rain