
Nandurbar News : दारूच्या नशेत अधिकारी कर्तव्यावर; जाब विचारला तर चक्क अधीक्षकांनाच धक्काबुक्की!
तळोदा (जि. नंदुरबार) : उपजिल्हा रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ डिसेंबरला रात्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाच धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे रुग्णालयातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे ऑन ड्यूटी वैद्यकीय अधिकारी दारूच्या नशेत कर्तव्यावर का आले, अशी विचारणा वैद्यकीय अधीक्षकांनी केल्याने त्याचा राग येऊन धक्काबुक्की झाल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयात संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडल्याने वरिष्ठांनी लक्ष द्यावे व या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. (Drunk Officer on Duty Beaten superintendent after asking for reason at taloda sub district hospital nandurbar news)
याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, की १ डिसेंबरला रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी ऑन ड्यूटी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास ठाकरे यांना आपण कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत का आलात, अशी विचारणा केली. डॉ. ठाकरे यांना याचा राग येऊन त्यांच्यासोबत असलेले दुसरे डॉ. गणेश पवार या दोघांनी मिळून वैद्यकीय अधीक्षक गायकवाड यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.
दरम्यान, रुग्णालयातच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयात त्या वेळी ३० रुग्ण दाखल होते. त्यात सहा प्रसूती झालेल्या माता व त्यांच्या बालकांचाही समावेश होता. येथील रुग्णालयात नेहमी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतून व धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. अशा वेळी येथील वैद्यकीय यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र अशा ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेला वाद कोणत्यातरी कारणाने पुढे येत असेल तर ते रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासारखे होऊ शकते, असे बोलले जात आहे.
हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
सिव्हिल सर्जनकडे तक्रार
दरम्यान, रात्रीच वैद्यकीय अधीक्षक गायकवाड यांनी सिव्हिल सर्जन नंदुरबार यांच्याकडे या प्रकरणाची माहिती दिली असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यामुळे येथील रुग्णालयात घडलेल्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व दोषींवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
"ऑन ड्यूटी वैद्यकीय अधिकाऱ्याला मी विचारणा केल्याने त्याचा राग येऊन मला धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यामुळे मी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे."
-डॉ. प्रफुल्ल गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तळोदा
"घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आहे. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल."
-डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार