यामुळे द्राक्षे उत्पादकांना चक्क वीस कोटींचा फटका..

दीपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण परतीचा पाऊसाचा जोर असल्याने द्राक्षबागांवर डावणी, करपा, गळकुज आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याची शक्यता असून, फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या पावसामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे द्राक्षे उत्पादकांकडून बोलले जात आहे.

नाशिक :  बागलाण तालुक्यातील बिजोटे गाव व परिसरात काढणीस आलेल्या द्राक्षांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.तेल्या रोगामुळे डाळिंब बागा उध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळले आहेत.अनेक शेतकऱ्यांनी मोठे कर्ज काढून व उसनवार पैसे घेऊन द्राक्ष बागा फुलविल्या आहेत.आर्थिक अडचण व नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत बहुतेक शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने अर्ली द्राक्ष घेतले. या पासून मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तयार द्राक्ष काढणीवर असतांनाच द्राक्षे मन्यांना तडे व रोगराई पसरल्याने या बागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले असून एकट्या बिजोटेत तब्बल वीस कोटींचा फटका द्राक्षे उत्पादकांना बसल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.

वीस कोटींचा फटका, द्राक्ष बागा विविध रोगाने ग्रासल्या. 

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण परतीचा पाऊसाचा जोर असल्याने द्राक्षबागांवर डावणी, करपा, गळकुज आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याची शक्यता असून, फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या पावसामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे द्राक्षे उत्पादकांकडून बोलले जात आहे. बिजोटेत १३५ शेतक-यांनी दीडशे हेक्टर द्राक्षे बागा उभ्या केल्या आहेत. बागलाणचा भाग अर्ली द्राक्षे उत्पादनात अग्रेसर असल्याने बहुतांश द्राक्षे उत्पादक मोठा पैसा खर्च करीत असतात. सुरूवातीला पाण्याची मोठी टंचाई असल्याने विकतचे पाणी घेऊन बागेला दिले जाते. मजूर, औषध फवारणी आदि विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे परतीच्या पावसामुळे नुकसान होत असल्याने द्राक्षे उत्पादक पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता

ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करपा, गळकुज रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांनाही अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरात द्राक्षे बागेतील मन्यांना तडे गेले आहेत. महसूलचे तलाठी पंकज सावंत यांनी प्रत्यक्ष द्राक्षे बागेवर जाऊन पाहणी केली. परिसरात तब्बल वीस कोटींचे द्राक्षे उत्पादक शेतक-यांचे नुकसान झाल्याचे उत्पादकांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. फुलोऱ्यातील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने अर्ली द्राक्षे बागेसाठी विमा योजना राबविण्याची मागणी द्राक्षे उत्पादकांनी केली आहे.

द्राक्षे उत्पादकांच्या व्यथा....

मी पहिल्याच वर्षी द्राक्षे भार धरला होता मात्र परतीच्या पावसामुळे अपयशी झालो. विकतचे पाणी घेतले लाखो रुपये खर्च करून काटकसरीने बाग उभी केली होती.- बळीराम जाधव, द्राक्षे उत्पादक बिजोटे.

.या पावसामुळे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे. द्राक्षे मन्यांना तडे गेले गेल्याने बागेतून उग्र वास येऊ लागला आहे. एकट्या बिजोटेत अंदाजे वीस कोटीचा फटका द्राक्षे उत्पादकांना बसला आहे.-अभिमन जाधव, द्राक्षे उत्पादक बिजोटे 

माझी चार एकर द्राक्षे बाग आहे, हातउसणवार व व्याजापोटी घेतलेले पैसे परतफेड करावी तरी कशी या संकटात सापडलो आहे. चार दिवसापासून बागेत जाणे सोडून दिले.- लोटन जाधव, बिजोटे 

आम्ही सोळा एकर बाग तयार केली होती. दुस-याच दिवशी द्राक्षे काढणीला तयारी होती. आजच्या घडीला द्राक्षे फेकण्याच्या अवस्थेत आहेत. टॅकरने विकतचे पाणी घेऊन द्राक्षे बाग फुलविली होती. या बागेवर तब्बल तीस लाख रुपये खर्च झाला आहे- पोपट जाधव, बिजोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to rain the grape growers hit twenty crores.