'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला 

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

संगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८ रिक्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी घारगाव, बोरबन, कुरकुंडी, माहुली परिसर हादरला. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपाच्या धक्क्यांनी परिसरात घबराट पसरली आहे.

घारगाव परिसराला शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. मात्र सदर धक्क्यांची तिव्रता कमी होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मात्र घारगाव, आंबीखालसा, कुरकुंडी, बोरबन, माहुली माळेगावपठार या गावांच्या परिसराला भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे घरांमधील भांडी खाली पडली, घरांचे पत्रेही हादरले. अचानक बसलेल्या हादऱ्यांनी रहिवाशांनी आरडाओरडा करीत घराबाहेर पळ काढला. घारगावच्या सरपंच अर्चना आहेर व बोरबनचे सरपंच संदेश गाडेकर, उपसरपंच राजेंद्र कान्होरे, माजी उपसरपंच सुरेश आहेर, संदिप आहेर, मंगेश कान्होरे यांनी भूकंपाच्या धक्क्यांची तिव्रता अधिक असल्याचे सांगितले.
 
संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देत ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. मागील वर्षी घारगाव परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्यांची नोंद नाशिकच्या मेरी संस्थेत झाली होती. घारगाव परिसरात ६४ किलोमीटर परिघामध्ये मंगळवारी सकाळी ८.३२ वाजण्याच्या ११५ सेकंद कालावधीत २.८ रिक्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद नाशिकच्या मेरी संस्थेत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी प्रशासन सतर्क झाले आहे.

Web Title: The earthquake shook the Ghargaon area