‘आरतीबाज’ नसल्याने पक्षात दुर्लक्षित - एकनाथराव खडसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

भुसावळ - ‘आरतीबाज’ नसल्याने माझी पक्षाला गरज नसावी, असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वाती वळण्याच्या उल्लेखाबाबत सहमती दर्शविली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात ‘जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा ‘आरतीबाज’, तर एकनाथराव खडसे हे विरोधी पक्षनेते व नंतर मंत्री असताना ‘पॉवरबॉज’ होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ‘पॉवर’ काढून घेतल्याने खडसे आता मुक्ताईनगरात वाती वळत आहेत’, अशी टीका केली होती. 

भुसावळ येथे खानदेश महोत्सवानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेनंतर श्री. खडसे यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी, उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमती दर्शविली. मात्र, वात कुठेही लागू शकते आणि एका वातीने अनेक बरबाद होतात, त्याचा उद्रेक मोठा असतो असा इशाराही त्यांनी दिला. असे असले, तरी दिव्यातील वातीनुसार उजेड देण्याचे काम आपण करणार असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. 

चाळीस वर्षे पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे हे विधान योग्यच आहे, असा खुलासाही त्यांनी केला. ‘समय बडा बलवान है’, असे सूचक विधान करून श्री. खडसे यांनी प्रभू रामचंद्रांचा संदर्भ दिला. जेथे रामालाही जेथे चौदा वर्षे वनवासात जावे लागले, तेथे आपण तर सर्वसामान्य माणूस असल्याचे उद्‌गार काढले. 

पक्षासाठी झटणार
धुळे महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार फलकावर आपला फोटो नसल्याबद्दल खडसे म्हणाले, की कदाचित माझ्या फोटोमुळे मते मिळणार नाही, असा पक्षाचा समज झाला असावा. पण, मी कधीही पक्षविरोधी कारवाया केलेल्या नाहीत आणि पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहे. यापुढेही पक्षासाठी झटणार असून, पक्षाने दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडणार आहे. 

वाल्यांचा पक्ष म्हणून ओळख नको
धुळे महापालिका निवडणुकीतील गुंडागर्दी तसेच भाजपत ऐनवेळी दिलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या प्रवेशाबाबत विचारले असता श्री. खडसे म्हणाले, की पक्षात कुणी ‘वाल्या’ आला, तरी त्याचा वाल्मीकी बनविण्याचे काम करू, असे पक्षश्रेष्ठींनी पूर्वीच सांगितले आहे. मात्र, वाल्यांचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse Politics