माणिकरावांच्या गुगलीने प्रतिस्पर्धी पॅनल गारद

vote
vote

येवला - येथील राजकारणात हजरजबाबी आणि डावपेचात माहिर असलेले ज्येष्ठ नेते म्हणजे माणिकराव शिंदे..त्यांच्या राजकीय गणितांचे हजार नमुने यापूर्वीच अनेकांनी पाहिले आहेत. पण आजही याचा प्रत्यय आला. माणिकराव रिंगणात उतरले अन् त्यांनी प्रतिस्पर्धी पॅनलच फोडले. तसेच दोन्ही पॅनेलचे एकत्रिकरण करून येथील औद्योगिक वसाहतीची निवडणूक आज बिनविरोध केली. विशेष म्हणजे माणिकरावांच्या गुगलीपुढे समोरच्या पॅनलच्या मातब्बर इच्छुकांना देखील माघार घ्यावी लागली.

वसाहतीच्या निवडणुकीसाठी तेरा जागांसाठी २६ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. तर दोन्ही पॅनलने उमेदवारांच्या जुळवाजुळवीची जोरदार फिल्डिंग लावली असल्याने ही निवडणूक चुरशीची होईल असे मंगळवारी शेवटच्या क्षणापर्यंत चित्र होते. मात्र ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी वसाहतीचे संस्थापक रमेशचंद्र पटेल यांच्यासह दोन्ही पॅनलच्या सर्वांशी चर्चा करत १२ संचालकांची नावे निश्चित केली. विशेष म्हणजे ज्यांना डावलायचे होते त्यांनाही पद्धतशीरपणे शिंदेंनी बाहेरचा रस्ता दाखवत बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले. आता 13 जागांपैकी 12 जागा बिनविरोध झाल्या असून, सोसायटी गटातून केवळ एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.

कारखानदार मतदारसंघ गटातील ६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सात जागांवर सुकृत पाटील, विष्णू खैरनार, शाम कंदलकर, अनिल कुक्कर, अंबादास बनकर, अजय जैन, भोलानाथ लोणारी यांची बिनविरोध निवड झाली. महिला राखीव गटातील दोन जागांसाठी अस्मिता विक्रम गायकवाड, जयश्री रामदास काळे यांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी योगेंद्र वाघ यांनी माघार घेतल्याने मुकेश चवळे यांची बिनविरोध निवड झाली. इतर मागासवर्गाच्या एका जागेसाठी दत्तकुमार महाले यांची बिनविरोध निवड झाली. नितीन आहेर व सुनील पैठणकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटाच्या एका जागेसाठी अॅड.नवीनचंद्र परदेशी यांची बिनविरोध निवड झाली. गंगाधर लोणारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

एका जागेचा हास्यास्पद तिढा..
सोसायटी गटात दोन मतदार असून, या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने माघारीवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. त्यामुळे प्रत्येकी एक मत मिळणार अशी स्थिती असल्याने निवडणुकीनंतरही चिठ्ठी पद्धतीने निवड होणार हे निश्चित आहे. अशी निवडणूक राजकीय इतिहासात प्रथमच होत आहे. या एका जागेसाठी सुवर्णा चव्हाण व प्रवीण पहिलवान या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सूचक नसल्याने छाननीत हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी योगेश उगलमुगले यांनी अवैध ठरवले होते. मात्र हरकतीनंतर ते वैध झाले होते. 

“उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वांची गटातटाचा विचार न करता न्याय देण्यासाठी आम्ही चर्चा केली. यातून नावे निश्चित करून इतरांना थांबण्याच्या सूचना केल्या व माझ्या शब्दाला मान देत सर्वांनी प्रतिसाद दिला. वसाहतीत राजकारण न करता विकासकारण करण्याच्या हेतूने मी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.”
- माणिकराव शिंदे ज्येष्ठ नेते येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com