Dhule News : म्हसदी परिसरात शेतकरी हतबल; रानडुकरे करताहेत रब्बी पिके फस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram crop ravaged by wild boars in the field of Pradeep Trimbak Deore in Ghubdya Shivara.

Dhule News : म्हसदी परिसरात शेतकरी हतबल; रानडुकरे करताहेत रब्बी पिके फस्त

म्हसदी (जि. धुळे) : वन्यपशू बिबट्याच्या धुमाकुळीनंतर रानडुकरांच्या उपद्रवामुळे म्हसदीसह परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. काढणीवर आलेला हरभरा, कांद्यासारख्या पिकांचे रानडुकरांकडून अतोनात नुकसान होत आहे.

येथील घुबड्या शिवारातील प्रदीप त्र्यंबक देवरे यांच्या शेतातील काढणीवर आलेले हरभरा पीक‌ रानडुकरे फस्त करीत आहेत. (Farmers desperate in Mhasadi area Wild pigs destroy Rabi crops Dhule News)

श्री. देवरे यांनी वन विभागास माहिती दिल्यावर वन कर्मचारी रमेश बच्छाव, एकनाथ गायकवाड, पंडित खैरनार, नितीन भदाणे यांनी पंचनामा केला. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पीक‌ काढणीवर आले आहे.

तथापि, पेरणी झाल्यापासून वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात रानडुकरांचा त्रास असतो. अशा ठिकाणी पीक निघेपर्यंत शेतकरी ‘देव पाण्यात टाकून’ उत्पन्न घरी येण्याची प्रतीक्षा करतात. यंदा मुबलक पाण्यामुळे रब्बी पेरणीची वाढ झाली आहे.

दुसरीकडे उन्हाळ कांदालागवड वाढली आहे. शेतात लागवड, पेरणी झालेले प्रत्येक पीक रानडुकरे फस्त करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

रानडुकरे असतात कळपाने

म्हसदी ते शेंदवड मांजरीपर्यंत मोठे वनक्षेत्र आहे. सुरक्षित वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रानडुकरे असल्याचे वन कर्मचारीच सांगतात. सध्याच्या परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीनंतर रानडुकरांचा त्रास असल्याचे शेतकरी सांगतात.

यंदा म्हसदीसह लगतच्या परिसरातील सर्व शिवारात बिबट्याच्या धुमाकुळीनंतर रानडुकरांनी शेतकऱ्यांना शेती करावी की नाही, हा प्रश्न उपस्थित केला आहे. रानडुकरे कळपाने शेतात दाखल होतात.

अशा वेळी एकटा-दुकटा शेतकरी रानडुकरांना प्रतिबंध करू शकत नाही. समजा तसा प्रयत्न केला तर रानडुकरे शेतकऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचे धाडस करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन विभागाने पंचनामा करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

"चार महिने दिवस-रात्र मेहनत करत गहू-हरभरा पीक‌ जतन केले आहे. ऐन काढणीच्या वेळेत रानडुकरे पीक फस्त करत आहे. वन विभागास माहिती दिल्यावर पंचनामाही झाला असला तरी भरपाईची प्रतीक्षा आहेच." -प्रदीप देवरे, शेतकरी, म्हसदी

टॅग्स :DhuleFarmeragriculturepig