
Dhule News : शिंदखेडा येथे शेतमजुरांच्या घराला आग; 40 हजारांच्या वस्तू अन् नोटा खाक
शिंदखेडा (जि. धुळे) : येथील जाधवनगरमधील शेतामधील मजुराच्या घराला रात्री लागलेल्या आगीत सुमारे ४० हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू आणि पाच हजारांच्या नोटा जळून खाक झाल्या. (Fire at farm laborers house in Shindkheda 40 thousand worth of goods and notes Dhule News)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
जाधवनगरमध्ये विहिरीजवळ देवमन गिरीधर माळी यांचे घर आहे. ते स्वतः पक्षघाताच्या आजाराने दोन महिन्यांपासून त्रस्त असल्याने मुलाकडे राहत आहेत. घराला कुलूप लावलेले आहे. शनिवारी (ता. १८) रात्री बारानंतर घरातून आगीचे लोळ दिसल्याने शेजारी व मुले धावत आली.
तोपर्यंत माळी यांच्या घरातील कपडे, धान्य, गाद्या व अन्य संसारोपयोगी वस्तू याशिवाय पाच हजारांच्या नोटा खाक झाल्या. एकूण ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घराजवळ आगपेटी आणि चार-पाच आगकाड्या पडलेल्या दिसून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्वतः गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या शेतमजुराच्या आयुष्यात उतारवयात संसारोपयोगी वस्तूंची राखरांगोळी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.