तब्बल पाच तास रास्ता रोको.....

satana onion andolan.jpg
satana onion andolan.jpg

 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीत आज तब्बल २१ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. मात्र व्यापार्‍यांच्या लिलाव न करण्याच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी थेट बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर तब्बल पाच तास उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन छेडले. शेतकरीविरोधी निर्णय घेणार्‍या केंद्र व राज्यातील भाजप महायुती शासनाच्या निषेधार्थ उत्पादक शेतकर्‍यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पूर्ववत लिलाव सुरू करण्यास संमती 
दरम्यान, तहसिलदार व व्यापारी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आजच्या आवक झालेल्या सर्व कांद्याचे लिलाव पूर्ण करावेत, उद्या पणन महामंडळाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई होणार असेल तर त्याची जबाबदारी घेतली जाईल, असे हमीपत्र बाजार समिती प्रशासनाकडून मिळाल्यानंतर व्यापार्‍यांनी पूर्ववत लिलाव सुरू करण्यास संमती दर्शविली. त्यामुळे शेतकर्‍यांनी चार तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. 

व्यापार्‍यांचा लिलावास नकारामुळे शेतकर्‍यांचा संताप
गेल्या चार दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने आज सकाळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली होती. मात्र केंद्र सरकारने काल रविवार (ता.२९) रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन कांदा व्यापार्‍यांना ५०० क्विंटलच्या साठवणुकीची मर्यादा घालून दिल्याने येथील सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सर्व कांदा व्यापार्‍यांनी लिलावाच पुकारा करण्यास असमर्थता दर्शविली. एकतर आधीच चार दिवस बाजार समिती बंद, त्यात शासनाने जाहीर केलेल्या निर्यातबंदीमुळे कोसळणारे भाव आणि व्यापार्‍यांचा लिलावास नकार यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत थेट बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सटाणा-मालेगाव रस्त्यावर ठिय्या देत उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी कोंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, जिभाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, मनसेचे पंकज सोनवणे आदींनी आंदोलनात सहभाग घेऊन शेतकर्‍यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी शेतकर्‍यांनी ‘कांदा निर्यातबंदी मागे घेतलीच पाहिजे’, ‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशी घोषणाबाजी करीत केंद्र व राज्यातील भाजप शासनाचा तीव्र निषेध केला. 

राजकीय नेत्यांचा पाठिंबा
यावेळी बोलताना माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले, शेतकरी विरोधी भाजप शासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याच्या निर्यातशुल्कात भरमसाठ वाढ केल्याने कांद्याचे दर घसरले होते. निर्यातबंदीमुळे आता पुन्हा कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यात ५०० क्विंटलच्या साठवणुकीची मर्यादा घालून शासन शेतकरी आणि व्यापार्‍यांची अडवणूक करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भाजप महायुती शासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी मतपेटीतुन या सरकारला नक्कीच उत्तर देतील. शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणीही श्री.चव्हाण यांनी केली. सत्तेत सहभागी असलो तरी 
शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी सर्वसामान्य जनता आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आम्ही नेहमी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे सांगून शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. 


यावेळी शैलेश सूर्यवंशी, जिभाऊ सोनवणे आदींची भाषणे झाली. आंदोलनात प्रमोद सोनवणे, राकेश सोनवणे, पोपट चव्हाण, शिवा सोनवणे, विनायक देवरे, राकेश आहिरे, प्रशांत बोरसे, पोपट आहिरे, अतुल अहिरे, हिरामण सोनावणे, बाळासाहेब खैरनार, सुरेश देवरे, रमेश देवरे, शिवजीत सोनवणे, पांडुरंग जाधव, नितीन सोनवणे, तुषार पवार, राजेंद्र काकुळते, विकी जाधव, जालिंदर खैरनार, देविदास आहिरे, दिलीप थोरात, राकेश भामरे, प्रशांत मोरे, रणजित आहिरे, विशाल पवार, रामदास भामरे, मन्साराम सावकार, नंदु कुवर, किरण रौंदळ आदींसह हजारो शेतकरी सहभागी होते.
दरम्यान, बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

आवक झालेल्या सर्वच कांद्याचे लिलाव करा, कांदा व्यापार्‍यांची बैठक

जोपर्यंत लिलाव पूर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला. त्यामुळे तहसिलदार इंगळे-पाटील यांनी बाजार समिती सभागृहात व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली. शासनाने साठवणुकीची मर्यादा घालून दिल्याने लिलाव केल्यास आमच्यावर कारवाईची शक्यता होऊ शकते. त्यामुळे चांदवड येथे जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापार्‍यांच्या बैठकीत निर्णय जाहीर झाल्यास लिलाव सुरू करण्याची भूमिका व्यापार्‍यांनी घेतली. मात्र बाजार समितीमध्ये आज आवक झालेल्या सर्वच कांद्याचे लिलाव करा, व्यापार्‍यांवर साठवणुकीसंदर्भात कोणतीही कारवाई होणार नाही याची हमी आम्ही घेतो, असे लेखी पत्र तहसिलदार श्री.इंगळे-पाटील, आमदार दीपिका चव्हाण, सभापती संजय सोनवणे, पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिल्याने व्यापार्‍यांनी लिलाव सुरू केले.

 बैठकीत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मनसेचे शहरप्रमुख पंकज सोनवणे, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, बाजार समिती संचालक केशव मांडवडे, संजय बिरारी, सरदारसिंग जाधव, प्रकाश देवरे, व्यापारी संदीप लुंकड, श्रीधर कोठावदे, वैभव अहिरे, मांगीलाल लुंकड, महेश कोठावदे, सुभाष अमृतकर, संदीप सोनवणे, शरद अहिरे, बबलू शेख, सागर अमृतकर आदींसह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित आहेत.

रुग्णवाहिका व स्कूलबसला रस्ता मोकळा करून दिला...

तब्बल चार पाच सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. याचवेळी एक अत्यवस्थ झालेल्या रूग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका येताच सर्व आंदोलन शेतकर्‍यांनी रस्त्यावरून बाजूला होत रुग्णवाहिका आणि शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या स्कूलबसेसला देखील रस्ता मोकळा करून दिला. 

शासनाने केला शेतकर्‍यांचा मोठा विश्वासघात

केंद्रातील भाजप शासनाने शेतकर्‍यांचा मोठा विश्वासघात केला आहे. गेल्या वर्षी कांदा मातीमोल दराने विकावा लागला होता. यावर्षीही जेमतेम भाव मिळत असताना शेतकर्‍यांनी मालाची साठवणूक स्वतःच्या जबाबदारीवर केली. मात्र कधी नव्हे तो चढया दराने कांदा विकला जाऊ लागला. शेतकर्‍यांचे समाधान भाजप शासनाला पाहावले नाही. शेतकर्‍यांना सर्वाधिक ‘बुरे दिन’दाखविणार्‍या शासनास विधानसभा निवडणुकीत कांदा उत्पादक धोबीपछाड मारल्याशिवाय राहणार नाहीत : यशवंत पाटील, कांदा उत्पादक शेतकरी, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com