मतमोजणीस्थळी सुविधांवर लक्ष केंद्रित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची मतमोजणी अंबड वेअर हाउसमध्ये 23 मेस होणार आहे. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या असुविधांची ओरड या वेळी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वेळी विशेष काळजी घेतली आहे.

नाशिक - नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची मतमोजणी अंबड वेअर हाउसमध्ये 23 मेस होणार आहे. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या असुविधांची ओरड या वेळी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वेळी विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी मतमोजणीस्थळी असलेल्या सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. 

अंबड वेअर हाउस येथे मंगळवारी (ता. 21) दुपारी निवडणूक निरीक्षक राजेशकुमार, अभिजित सिंग, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी भेट दिली. मतमोजणी केंद्रातील बैठकव्यवस्था, तेथील हवा, प्रकाशव्यवस्था याची पाहणी केली. मतदानयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेतला. त्यानंतर मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या चाहत्यांची अंदाजे पाच हजारांच्या घरात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक, पाणीव्यवस्थेची पाहणी केली. मतमोजणी अधिकारी-कर्मचारी व अन्य जणांच्या जेवणाची व्यवस्था बघितल्यानंतर मीडिया सेलची पाहणी केली. मतमोजणीस्थळी हॉटलाइनची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी हॉटलाइनसह ध्वनिव्यवस्थेचे प्रात्यक्षिक करून पाहण्यात आले. सुविधांत कुठलीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घेण्याचे संबंधितांना सूचित केले. 

नाशिक, दिंडोरी संघांतील मतमोजणीच्या फेऱ्या 
नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर- 24, नाशिक पूर्व- 26, नाशिक मध्ये- 22, नाशिक पश्‍चिम- 27, देवळाली- 19, इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर- 21 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव- 25, कळवण- सुरगाणा- 25, चांदवड- देवळा- 22, येवला- 23, निफाड-19, दिंडोरी- पेठ- 24 फेऱ्यांत मतमोजणी होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Focused on counting facilities