
Dhule News : चारही शिक्षिका लेकींनी दिला आईला खांदा अन् मुखाग्नी
कापडणे (जि. नाशिक) : नव्या युगात लेकी मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत. त्याही गगन भरारी घेवू लागल्या आहेत. आई-वडिलही मुलांसम वागणूक देत आहेत. परिणामी कुठेही त्या कमी पडत नाहीयेत.
प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली आहे. पुढे जाण्यासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. पारंपारिक रितीरिवाजांमध्ये मात्र त्यांनी गौण स्थान मिळत असते.
पण, नंदुरबार येथे वास्तव्यास असलेल्या व मुळच्या कळंबू येथील चारही शिक्षिका लेकींनी आईच्या अंत्ययात्रेत खांदा आणि स्मशानभूमीत मुखाग्नी देत पारंपारीक विचारांना छेद देत नवा आदर्श निर्माण केला आहे. (four teacher daughters gave funeral rituals to mother Dhule News)
कंळबू (ता. शहादा) येथील सुशिलाबाई बोरसे यांचे गुरूवारी (ता. २) ह्रदयविकाराने निधन झाले. नंदूरबार येथील प्यारीबाई ओसवाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक श्रीराम बोरसे यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या चारही लेकी वैशाली बोरसे (प्यारीबाई ओसवाल शाळेत), शितल बोरसे (दोंडाईचा नगरपालिका शाळेत), प्रा. प्रज्ञा बोरसे (समता कनिष्ठ महाविद्यालयात) व गायत्री बोरसे शिक्षिका आहेत. आईच्या निधनाची वार्ता समजताच त्यांनी तातडीने नंदूरबार गाठले.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
आईला खांदा आणि मुखाग्नी देण्याची भूमिका त्यांनी वडिलांजवळ मांडली. बोरसेगुरूजीही पुरोगामी विचारसरणीचे असल्याने लेकींच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. या चारही लेकींनी चुलत भाऊ जिजाबराव पाटील यांच्या साथीने खांदा आणि मुखाग्नीही दिला.
विशेष म्हणजे चारही लेकी पुर्ण अंत्ययात्रेत सहभागी झाल्या. नंदूरबार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. आर. जे. पाटील. प्रा. सतिष पाटील, प्रा. दिनेश पाटील व चेतन पाटील या चारही जावयांनीदेखील या भूमिकेचे स्वागत केले.
दरम्यान अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार यात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने पुढे येवू लागल्या आहेत. हे मोठे आशादायक चित्र निर्माण होत आहे.