Latest Marathi News | प्रस्थापितांना धक्का, तरुणांना संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election Results

Gram panchayat Election : प्रस्थापितांना धक्का अन् तरुणांना संधी!

धुळे/वार्सा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात शिरपूर तालुक्यात शतप्रतिशत भाजप, शिंदखेडा तालुक्यात भाजपची, तर धुळे तालुक्यात काँग्रेसची सरशी आणि साक्री तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात मात्र प्रस्थापितांना धक्का, तर प्रथमच नव्या दमाच्या तरुण चेहऱ्यांना संधी देत त्यांचा लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी समावेश करून घेतला.

अशात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र ग्रामपंचायतीवर आपापल्या सत्तेचे दावे-प्रतिदावे केले आहेत. जिल्ह्यात रविवारी (ता. १८) मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर मंगळवारी (ता. २०) मतमोजणीसह ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.

१२८ पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १२० ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया राबविली गेली. यात एक हजार २१२ जागांसाठी दोन हजार ३६२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतदानापूर्वी सरपंचपदाचे १२, तर सदस्यपदाचे ४०० उमेदवार बिनविरोध झाले होते. (Gram Panchayat Election result Opportunity to youth Dhule News)

हेही वाचा: Gram Panchayat Election Result : सिन्नरला ग्रामपंचायत निवडणुकीत वाजे गटाचा डंका!

धुळे तालुका

धुळे तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींपैकी सहा सरपंच आणि ८२ सदस्य बिनविरोध झाले होते. निवडणुकीत उर्वरित सरपंचपदासाठी ७६ आणि सदस्यपदासाठी ५४७ उमेदवार रिंगणात होते. निकालात काँग्रेसने महाविकास आघाडीसह २५, तर भाजपने १७ ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा केला. तसेच भाजपने काँग्रेसला नऊ, मविआला दोन, शिवसेनेच्या शिंदे गटाला चार, तर ठाकरे गटाला एक जागा मिळाल्याचा दावा केला. याबाबत विविध पातळीवरचा कौल घेतला असता ३३ पैकी काँग्रेसला १८, भाजपला ११, राष्ट्रवादीला दोन, तर शिवसेनेच्या गटांना दोन ग्रामपंचायतींवर सत्तेची संधी मिळाल्याचा दावा झाला. काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील व भाजपतर्फे खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रा. अरविंद जाधव यांच्यातर्फे दावे-प्रतिदावे झाले.

शिंदखेडा तालुका

शिंदखेडा तालुक्यात भाजपतर्फे १३, स्थानिक आघाडी सात, शिवसेनेचा ठाकरे गट दोन, तर काँग्रेसला एका ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाल्याचा दावा झाला. याउलट काँग्रेसतर्फे १६ ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा झाला. याबाबत विविध स्तरांवरून कौल घेतला असता भाजपला १४, स्थानिक विकास आघाडीला पाच, शिवसेना ठाकरे गट दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाल्याचा दावा झाला. भाजपतर्फे आमदार जयकुमार रावल व काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी दावे-प्रतिदावे केले.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणारा तोतया आर्मी अधिकारी अटकेत

शिरपूर तालुका

शिरपूर तालुक्यात आमदार अमरिशभाई पटेल यांचा करिश्मा पुन्हा दिसून आला. तेथे १७ पैकी १७ ग्रामपंचायती भाजपच्याच ताब्यात आल्या.

साक्री तालुक्यात‌ मिक्स पॅटर्न

साक्री तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींपैकी सरासरी ४५ ग्रामपंचायती या पश्‍चिम पट्ट्यात होत्या. त्यात काही ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन नव्या ग्रामपंचायती झाल्या. त्यात कुडाशी, टेंभे, राईनपाडा, काकरदे, वाकी, सुकापूर यासह अन्य ग्रामपंचायतींत प्रस्थापिकांना धक्का देत नव्या दमाचे तरुण चेहरे निवडून आले. त्यांचा ग्रामस्थांनी लोकशाही प्रक्रियेत प्रथमच प्रवेशाचा मार्ग सुकर केला. साक्री तालुक्यात सरासरी ५० ते ६० टक्के नवे तरुण चेहरे ग्रामपंचायतीच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. या तालुक्यात पक्षपातळीवर निवडणुका झाल्या नाहीत. तसेच पक्षीय विचारसरणी किंवा पक्षीय शिक्का नसलेले बहुतांश उमेदवार निवडून आले आहेत. काही ग्रामपंचायतींच्या निकालात मिक्स पॅटर्न दिसून आला आहे. मिक्स पॅटर्नमध्ये भाजप, शिवसेनेचा शिंदे व ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीने नशीब आजमावयाचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: Gram Panchayat Election : मालेगाव तालुक्यात भुसे- हिरे 50-50!; प्रस्थापितांचा दारुण पराभव