Gram Panchayat Election : साक्रीत उत्साहात मतदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Queues of voters to vote in Gram Panchayat elections.

Gram Panchayat Election : साक्रीत उत्साहात मतदान!

साक्री (जि. धुळे) : तालुक्यात ५० ग्रामपंचायतींसाठी मतदानप्रक्रिया झाली. यात सर्वच ठिकाणी मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. सकाळी काहीसे कमी मतदान झाल्यानंतर दुपारच्या सत्रात मात्र मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यामुळे तालुक्यात दुपारी साडेतीनपर्यंत सरासरी ६८.५८ टक्के मतदान झाले होते. यातही भाडणे, कासारे, धाडणे, दहिवेल, वसमार, भामेर आदी ठिकाणी मतदारांनी रांगा लावत हक्क बजावला. (Gram Panchayat Election Voting with enthusiasm at sakri dhule news)

तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून, यातील पाच ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ५० ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. यात ५० सरपंच व २५५ सदस्यांसाठी मतदान झाले. तालुक्यातील १६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. थेट सरपंच निवडीमुळे या निवडणुकीत मोठी चुरस असून, सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत.

सकाळी मतदानाला सुरवात झाल्यानंतर दहिवेल येथे मतदान यंत्रात बिघाड झाला होता. या ठिकाणी मतदान यंत्र बदलण्यात आले, तर उर्वरित ठिकाणी मात्र सुरळीत प्रक्रिया सुरू झाली. ग्रामपंचायत निवडणूक असल्याने स्थानिक पातळीवर एकेक मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांची धडपड दिसून येत होती. दरम्यान, थेट सरपंच निवडीमुळे निवडणुकीत मोठी चुरस असल्याने पोलिस प्रशासनदेखील सतर्क होते. यात सायंकाळपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक बाचाबाचीच्या घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Gram Panchayat Election : सौंदाणेत 64.64 टक्के मतदान निकालाबाबत उत्सुकता!

शिंदखेड्यात २२ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान

शिंदखेडा तालुक्यातील २१ सरपंचपदासाठी ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर १६८ सदस्यपदासाठी ३६९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. एकूण ७५ प्रभागांसाठी निवडणूक होत आहे.

रविवारी मतदानाच्या दिवशी १७ हजार ८० महिलांनी, तर १८ हजार ७९१ पुरुषांनी मतदान केले. एकूण ४७ हजार ८८० पैकी ३५ हजार ८७१ मतदारांनी म्हणजे ७६ टक्के मतदारांनी हक्क बजावला.

हेही वाचा: Indian Railway : रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून 23 लाखांचा दंड वसूल