महिला सदस्यांच्या नशिबी सत्कारही नाही  ​

एल. बी. चौधरी 
Wednesday, 10 February 2021

राजकारणात प्रस्थापितांचे आरक्षण सोयीचे न निघाल्यास ते आपल्या महिला नातेवाइकांना निवडणुकीत उभे करतात.

सोनगीर: शासनाने पुरुष व स्त्रियांना समान हक्क देत नोकरी व राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. उर्वरित ५० टक्के अर्थातच पुरुष वर्गाला आहे. महिला आरक्षण विधेयक २००८ मध्ये मंजूर झाले. त्यास १२ वर्षे होऊनही पुरुषी अहंकार अद्याप गेलेला नसल्याचे दिसते. तालुक्यात काही गावांमध्ये महिलाराज आले असे म्हटले जाते. पण त्याची फक्त कागदोपत्री नोंद असते. प्रत्यक्ष महिला सदस्यांऐवजी त्यांचे पुरुष नातलगच कामकाज पाहतात. याचा प्रत्यक्ष अनुभव सोनगीरला आला. येथील नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा दोनदा सत्कार झाला. पण महिला सदस्यांच्या नशिबी सत्कारही नव्हता की काय? त्यांच्या नातेवाइकांनीच सत्कार स्वीकारला. यामुळे पुढील पाच वर्षांत महिलांना ग्रामपंचायतीत कितपत बोलण्याची संधी मिळते हा प्रश्नच आहे. 

आवश्य वाचा- पहिल्याच पावसात गळतीमुळे बंधारे निरुपयोगी; कोट्यवधींचा निधी पाण्यात 
 

राजकारणात पुरुषी वर्चस्व मोडून काढण्यासाठी शासनाने सर्व गटातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव केल्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारणात त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्वत्र महिलांच्या जागी पुरुषच कामकाज पाहतात. अर्थात याबाबत काही ठिकाणी अपवाद असू शकतात. मात्र राजकारणात प्रस्थापितांचे आरक्षण सोयीचे न निघाल्यास ते आपल्या महिला नातेवाइकांना निवडणुकीत उभे करतात. मतदारांना प्रचारापुरते महिला उमेदवार दिसतात. निवडून आल्यानंतर त्या दिसतच नाहीत. त्यांचे पुरुष नातलगच गावात मिरवितात. सत्कार समारंभ, उद्‍घाटन, प्रमुख पाहुणे म्हणून किंवा कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व ठिकाणी निवडून येणारा बाजूलाच राहतो पण पुरुष हजर राहतात. 

आवश्य वाचा- चांगली बातमी: जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त १०० कोटी 

महिलाही हुशार, सुशिक्षित व व्यवस्थित कामकाज पाहू शकतात. पण महिलांना त्यांचे नातलगच प्रगती करू देत नाहीत. दरम्यान, येथे नवनिर्वाचित सदस्यांचा दोनदा सत्कार झाला. एका सत्काराला भावी सरपंच रुखमाबाई ठाकरे उपस्थित होत्या. मी महिला असले तरी पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात मी स्वतःच लक्ष घालून विकास करेन, असे श्रीमती ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, यापुढे तरी महिलांना काम करू द्या. महिलांचा जन्म केवळ चूल आणि मूल सांभाळण्यासाठीच असतो या विचारातून बाहेर या, अशी अपेक्षा सुजाण ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat marathi news songire new women members not even honored