निमगावच्या हनुमंताची हनुमान उडी!

प्रमोद पाटील : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

घरची परिस्थिती हलाखीची असताना कधी बांधावर तर कधी झाडाखाली अभ्यास करत हनुमंताने मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. परिस्थितीवर मात करून हनुमंताने शिक्षणाच्या जोरावर घेतलेली हि हनुमान उडी निमगाव मढ व परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. येथील माजी सरपंच नवनाथ लभडे तसेच अनेकांनी त्यांच्या या दैदिप्यमान यशाचे अभिनंदन केले.

येवला : निमगाव मढ येथील शेती मजुरी, भाजीपाला विक्री करणारे प्रकाश पारधी व लक्ष्मीबाई पारधी यांना चार मुलींच्या नंतर हनुमान जयंतीला झालेल्या मुलाचे नाव हनुमंत ठेवले. गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला ध्यानात घेत हनुमंत पारधी याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत नुकतीच थेट आरटीओ विभागात उच्च पदावर नोकरी संपादन केली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी नुकतीच त्यांची नियुक्ती अहमदनगर येथे झाली आहे.

 प्रतिकूल परिस्थितीत मजुरी,भाजीपाला विक्री 

आजोबा रामचंद्र पारधी हे पूर्वी हेल्यावरून पखालने लोकांच्या घरी दारोदार पाणी घालण्याचे काम करायचे तर वडील प्रकाश पारधी हे आपल्या दीड एकर शेतीत कष्ट करून आपली कुटुंब चालवत. कधी घरची दीड एकर शेतीत काम तर कधी मजुरी, भाजीपाला विक्री, शिवणकाम करत आपल्या चार मुली व मुलाला शिक्षण दिले. मुलगा हनुमंत याचे प्राथमिक शाळेत निमगाव मढ जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण रवंदे (ता.कोपरगाव) येथील रयत शिक्षण विद्यालयात झाले. दहावी नंतर कोपरगाव येथील एस एस जी एम कॉलेज येथे बारावी ८५ टक्के गुणांनी उत्तीर्ण होत नाव कमावले. बीई मेकॅनिकलचे अवसारी आंबेगाव (पुणे) येथे शिक्षण घेतले. 

कधी बांधावर तर कधी झाडाखाली अभ्यास करत हनुमंताने मिळवले यश

यानंतर पुण्यात दीड वर्ष नोकरी केली मात्र मनात असलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी व आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. एमपीएससी चांगल्या रँकने उत्तीर्ण होत हनुमंत पारधी हे महाराष्ट्र शासनाच्या आरटीओ विभागात सहाय्यक मोटार निरीक्षक इन्स्पेक्टर पदावर नियुक्ती झाली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना कधी बांधावर तर कधी झाडाखाली अभ्यास करत हनुमंताने मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. परिस्थितीवर मात करून हनुमंताने शिक्षणाच्या जोरावर घेतलेली हि हनुमान उडी निमगाव मढ व परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. येथील माजी सरपंच नवनाथ लभडे तसेच अनेकांनी त्यांच्या या दैदिप्यमान यशाचे अभिनंदन केले.

लक्ष्मीबाईंचे स्वप्न फुलले

आई लक्ष्मीबाई या गावातील सार्वजनिक कार्यक्रमात तसेच गावात कुणाच्या घरी शुभकार्य, दहावा, लग्नात न लागता जेवण पंक्तीला पाणी वाटपाचे काम करत असतात. त्यांचा मुलगा हनुमंत अधिकारी झाल्याने गावातून तुमच्या समाजसेवेचे, पुण्यकामाचे तुम्हाला फळ मिळाल्याचे गावात बोलले जात आहे. यामुळे वडील प्रकाश व आई लक्ष्मीबाई दोघांनाही आनंद झाला आहे.

यश उशीरा मिळेल पण ते नक्कीच मिळेल
" गरिबीला व हलाखीच्या परिस्थितीला न लाजता आपण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते. माझ्या आईवडिलांनी केलेले कष्ट मी विसरणार नाही. तरुणांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासात लक्ष द्यावे. यश उशीरा मिळेल पण ते नक्कीच मिळेल.
- हनुमंत पारधी , निमगाव मढ ता.येवला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hanumant pardhi recent appointment as Assistant Motor Vehicle Inspector