बागलाणमधील हरणबारी व केळझर धरणे पूर्ण भरली

dam
dam

सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

पठावे, दसाणे व जाखोड पाझर तलावही पूर्ण भरल्याने हत्ती व कान्हेरी नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीला आलेल्या पुरामुळे गेली १५ वर्षात पहिल्यांदाच सोमपूर गावाचा पूल पाण्याखाली गेला असून, तांदुळवाडी, भडाणे, दरेगाव व इतर आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. हरणबारी धरण लाभक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे श्रीपूरवडे, उत्राणे, आसखेडा या गावांचे पुलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने मोसम व आरम नदीकाठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसामुळे तालुक्यातील पाणीपुरवठा योजनाही चार्ज होणार असल्याने आता पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात काल दिवसभर व रात्री सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे सकाळी हरणबारी धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून मोसम नदीपात्रात ६००० क्युसेस पूरपाणी सोडण्यात आले. तर केळझर धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले. दोन्ही धरणातील सांडव्यावरून पूरपाणी वाहत असल्याने धबधब्याचे स्वरूप आले आहे. दसाणे, जाखोड व पठावे पाझर तलाव १०० टक्के भरल्याने हत्ती व कान्हेरी नद्यांना पूर आला आहे. या दोन्ही नद्यांमधील जवळपास तीन हजार क्युसेस पूरपाणी आरम नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे या मोसमात आरम नदीला पहिल्यांदाच पूर आला आहे. आज सकाळी ९ वाजता येथील सटाणा - मळगाव पुलाजवळील बंधाऱ्यापर्यंत आरम नदीचे पूरपाणी पोहोचले. नदीला आलेला पूर बघण्याकरिता आज सकाळपासूनच शहरालगत असलेल्या मळगाव पुलावर तसेच नाशिक रस्त्यावरील पुलावर शहरवासीयांनी गर्दी केली. आरम, हत्ती व कान्हेरी नदीपात्रात पाणी आल्याने सटाणा शहरासह आरम नदीकिनारी असलेल्या डांगसौंदाणे, निकवेल, कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड, जोरण, तळवाडे दिगर, किकवारी, वटार, मोरकुरे गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा उद्भव चार्ज झाल्याने तालुक्यातील टंचाईस्थिती दूर होण्यास मदत होणार आहे.  

तालुक्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावातील जनतेने सतर्क राहावे, नदीकाठी व पुलांवर गर्दी करू नये, सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, पुराच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे. तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असल्याचेही श्री. महाजन यांनी 'सकाळ' ला सांगितले. 

५ जून २०१८ रोजी 'सकाळ' तर्फे राबविण्यात आलेल्या आरम नदी स्वच्छता अभियानामुळे नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यांचे सपाटीकरण करण्यात आले होते. नदीपात्राच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडुपे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला होता. त्यामुळे काल गुरुवार (ता.१६) रोजी पाऊस झाल्याने आरम, हत्ती व कान्हेरी नद्यांचे पूरपाणी नदीपात्रात वाहू लागले आहे. 'सकाळ' ने राबविलेल्या या उपक्रमाचे आज पूर पाहण्यासाठी पुलांवर आलेल्या नागरिकांनी कौतुक केले. 

बागलाण तालुक्याच्या मंडलस्तरीय गावातील पावसाची आकडेवारी... 
सटाणा - ५७ मिलीमीटर
ताहाराबाद - ५१ मिलीमीटर 
मुल्हेर - ६४ मिलीमीटर 
विरगाव - ५३ मिलीमीटर
डांगसौदाणे - ६० मिलीमीटर
नामपूर - ४२ मिलीमीटर
ब्राम्हणगाव - ३० मिलीमीटर
जायखेडा - ६० मिलीमीटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com