नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

नाशिक -  हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत रविवारी (ता. 4) जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत दिवाळीच्या सणावर नाराजीचा शिडकावा केला. 

नाशिक -  हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत रविवारी (ता. 4) जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत दिवाळीच्या सणावर नाराजीचा शिडकावा केला. 

नाशिक शहरात अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विशेषत- दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या रविवारमुळे आज बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी असताना पाऊस आला. त्यामुळे व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांचीही धावपळ उडाली. तुलनेत ग्रामीण भागात मात्र पावसाचा जोर कमी होता. मालेगाव, दिंडोरी, बागलाण, चांदवड तालुक्‍यांत कुठे विजांच्या कडकडाटासह जोरदार, तर कुठे तुरळक पाऊस झाला. त्र्यंबकेश्‍वर शहर व परिसरात केवळ ढगांचा गडगडाट व विजा चमकत होत्या. तर तालुक्‍यातील काही गावांत मात्र पाऊस झाला. पेठ तालुक्‍यातही दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. पावसाने सायंकाळी काही ठिकाणी तुरळक स्वरूपात हजेरी लावली. येवला तालुक्‍यातही साधारण असेच चित्र होते. ढकांबे-म्हसरूळसह पंचवटी, नाशिक रोड, नांदूर-मानूर, देवळाली कॅम्प आदी भागांत मेघगर्जनेसह एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. 

दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी (ता. 5) शहर व जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

नांदगावला नागरिकांची तारांबळ 
नांदगाव - शहर व परिसरात ढगांच्या व विजांच्या कडकडाटासह सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. सुरवातीला काही मिनिटे तुरळक स्वरूपात झालेल्या पावसाने रात्री आठ ते नऊच्या सुमारास पुन्हा हजेरी लावली. साकोरा, न्यायडोंगरी व परिसरातही विजांच्या कडकडाटासह तुरळक प्रमाणात पाऊस झाला. 

मालेगावला मुसळधार 
मालेगाव - वसूबारसच्या मुहूर्तावर शहर व परिसरात सायंकाळी दोन तास मुसळधार पाऊस झाला. आतापर्यंत तग धरून असलेल्या कांदा, डाळिंब या प्रमुख पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले. तर अर्ली द्राक्षांचे व राखून ठेवलेल्या चाऱ्याचे मात्र नुकसान झाले. चिंचवे गा. येथील पांडुरंग सावळे यांची म्हैस विजेच्या धक्‍क्‍याने ठार झाली. तालुक्‍यात सर्वत्र कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला. दिवसभर कडक ऊन पडले होते. सायंकाळी साडेपाचनंतर जोरदार वादळी वारे सुरू झाले. सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. दिवाळीमुळे शहरातील मुख्य रस्ते व चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. वादळी वारे व पावसामुळे व्यावसायिकांची धावपळ झाली. 

दरम्यान, हा बेमोसमी पाऊस द्राक्षवगळता इतर पिकांना फायदेशीर ठरणार आहे. विशेषत- कांदा व डाळिंबाला याचा फायदा होईल. तालुक्‍यातील येसगाव परिसरात शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्ष घेतले आहेत. या भागात अर्धा तास पाऊस झाला. तसेच, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी चारा व चाऱ्याची कुट्टी धुळे, जळगाव आदी भागांतून आणली आहे. त्याचेही या पावसाने नुकसान झाले. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या निमगावसह माळमाथा, काटवन, दाभाडी, आघार या भागात चांगला पाऊस झाला. 

द्राक्ष वगळता सर्वच पिके व भाजीपाल्याला हा पाऊस फायदेशीर आहे. सलाईनवर जगणारी पिके, भाजीपाला व फळझाडांना बळकटी मिळेल. कांदा व डाळिंबाला जीवदान मिळेल. अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष होते. अजून दमदार पाऊस झाल्यास ते कमी होऊ शकेल. 
-अरुण देवरे,  उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ 

दिंडोरी तालुक्‍यातही नुकसान 
दिंडोरी/लखमापूर - दिंडोरी तालुक्‍यात बेमोसमी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले असून, पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्‍यातील खडक सुकेणे, चिंचखेड, जोपूळ, पालखेड, निळवंडी, पाडे, लखमापूर, दहेगाव, ओझे, परमोरी, कादवा कारखाना, वणी, बोपेगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाने पोंगा व फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. सोयाबीन, भात, नागली, मका आदी पिकांचाही सोंगणीचा हंगाम सुरू असून, निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. 

ढगाळ हवामानामुळे द्राक्षाचे प्रचंड नुकसान 
वडनेरभैरव - यंदा कमी पाऊस पडूनदेखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने महागडे द्राक्षपीक घेण्याचा प्रयत्न केला. बागांची छाटणी होऊन दीड महिना उलटला असताना, बदलत्या तापमानामुळे द्राक्ष शेतीवर विपरीत परिणाम होऊन, शेतकऱ्यांना कधीही भरून न निघणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. फुलारा अवस्थेत बागेची अत्यंत धोकादायक परिस्थिती असते. याच काळात ढगाळ व बदलत्या तापमानात घडांमध्ये मररोग, कुज, गळ यामुळे 20 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकरावर द्राक्षाचे पीक घेतले जाते. गेल्या वर्षी लागवड झालेल्या बागांचे ढगाळ वातावरणामुळे मोठे नुकसान होत आहे. 

माझी एक एकर नवीन लागवड केलेले माणिकचमन वाणाची बाग फुलारा अवस्थेत पूर्णपणे कुज होऊन गेली. हा प्लॉट सोडून देण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत झालेला उत्पादन खर्च वाया गेला आहे. 
-नवनाथ थेटे, द्राक्ष उत्पादक, धोंडगव्हाण (ता. चांदवड) 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष पीक घेतले जाते. हंगाम सुरू झाल्यापासूनच तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यंदा दव-बादाड नसतानाही अशा प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. 
-भाऊसाहेब भालेराव, संचालक, द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Nashik district