जळगावातून शेकडो "आयटी'यन्सचे "वर्क फ्रॉम होम'; मुंबई, पुण्याशी घरातूनच "कनेक्‍ट'

मिलिंद वानखेडे
Friday, 1 May 2020

"फिजिकल डिस्टन्स' ठेवण्यासाठी आयटी कंपन्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह मोठ्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त गेलेले तरुण अभियंते​ लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीच आपल्या घराकडे परतले.  त्यांनी तांत्रिक अडचणींवर मात करत आपल्या घरूनच काम सुरू ठेवले आहे. 

जळगाव : कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. विशेषतः मुंबई, पुण्यातील जवळपास 85 टक्के "आयटी'यन्सचे "वर्क फ्रॉम होम' सुरू असून, यात जळगावमध्ये परतलेल्यांची संख्याही मोठी आहे. हे सर्व तरुण अभियंते घरात बसूनच नेटवर्किंगच्या माध्यमातून जबाबदारी पार पाडत आहेत. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' काळात सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यात सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्क उपस्थिती, केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवणे यासारख्या कडक उपाययोजना केल्या आहेत. "फिजिकल डिस्टन्स' ठेवण्यासाठी आयटी कंपन्यांना देखील घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह मोठ्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त गेलेले तरुण लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीच आपल्या घराकडे परतले असून, त्यांनी तांत्रिक अडचणींवर मात करत आपल्या घरूनच काम सुरू ठेवले आहे. 

तांत्रिक अडचणींवर मात 
आयटी अभियंता असलेली प्रियांका दुसाने म्हणते, मी पुणे येथील आयटी इंडस्ट्रीत सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. "लॉकडाउन' दोन दिवस आधी कंपनीने आम्हाला "वर्क फ्रॉम होम' करायला सांगितले. सध्या घरूनच (अर्जुननगर, जळगाव) काम करत आहे. इतर सहकाऱ्यांशी मोबाईलद्वारे संवाद साधून विविध प्रोजेक्‍टवर काम सुरू आहे. काम करताना काही प्रमाणात नेटवर्कची अडचण येते. बऱ्याचदा रेंज मिळत नसल्याने कामाचे तास वाढतात. परंतु सध्याच्या काळात "फिजिकल डिस्टन्सिंग'साठी हा चांगला निर्णय आहे. 
 
घरीही कार्यालयीन शिस्त 
रागिणी मोरे ही पुण्यातील सेवा क्षेत्रातील आयटी कंपनीत अभियंता आहे. रागिणी "लॉकडाउन' होण्यापूर्वीच 20 मार्चला जळगावात (असावानगर, पिंप्राळा) दाखल झाली. कंपनीच्या सूचनेनुसार आता तिचे घरूनच काम सुरू आहे. "वर्क फ्रॉम होम' करताना सुरवातीला काही अडचणी येत होत्या. मात्र, आता त्याचा सराव झाला आहे. रोजचे काम वेळेत पूर्ण करणे, ऑफिसच्या कायम संपर्कात राहणे, कामावर लक्ष केंद्रित करणे हे कटाक्षाने पाळावे लागते. त्यासाठी स्वत:हूनच कार्यालयीन शिस्त लावून घेतली असल्याचे रागिणी सांगते. 
 

कामात शंभर टक्के योगदान 
शहरातील मुकुंदनगरातील किरण चौधरी हा हिंजेवाडीतील (पुणे) एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून टेक्‍निकल लीड करतो. तो म्हणतो, कंपनीने सगळ्यांनाच घरी बसून काम करण्याची संधी दिल्याने दीड महिन्यांपूर्वी मी पुण्याहून जळगावला आलो. कंपनीच्या सूचनेनुसार घरूनच काम करीत आहे. आयटी क्षेत्र असल्याने तशी फारशी अडचण येत नाही. कंपनीने लॅपटॉप देखील उपलब्ध करून दिले आहेत. शंभर टक्के टीम घरून काम करीत आहे. माझ्या टीमध्ये 15 जण आहेत. या सर्वांशी फोन, व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संपर्कात असतो. 
 

"ऑनलाइन' कनेक्‍ट कायम 
जळगावातील अर्जुनगरस्थित पवन पठार हा घणसोलीतील (नवी मुंबई) नामाकिंत आयटी कंपनीत कार्यरत आहे. पवन म्हणतो, लॉकडाउनच्या आठवडाभरापूर्वी कंपनीने "वर्क फ्रॉम होम'ची परवानगी दिली. घरून काम करताना तांत्रिक बाबीवर विशेष लक्ष देणे आवश्‍यक असते. "ऑनलाइन'ला हाय स्पीड, वाय-फाय, हॉटस्पॉट्‌स, वेबकॅम, हेडफोन्स, आदीवरच कामाची गती अवलंबून आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्क असतो. फोन, व्हिडिओ कॉलिंगद्वारे कामाचे अपडेट्‌स देत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of "IT's" work from home from Jalgaon; 'Connect' from home to Mumbai, Pune