पत्नीवियोगाने चौथ्याच दिवशी पतीचाही मृत्यू!

प्रा.भगवान जगदाळे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पती-पत्नीचे एकाच दिवशी उत्तरकार्य...
न्याहळदे दाम्पत्याचा दशक्रिया विधी हा अनुक्रमे मृत्यूच्या दहाव्या दिवशी होणार असून उत्तरकार्य मात्र कै.तुकाराम न्याहळदे यांच्या दशक्रियेच्या दिवशी अर्थात एकाच दिवशी होणार आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही पती-पत्नी एकमेकांशी मित्र-मैत्रिणींसारखे वागत असल्याने तरुण पिढीसह इतरांनाही त्यांचा हेवा वाटत असे. त्यांचे आयुष्यात कधीच भांडण व मतभेद झाले नसल्याचे जुने जाणकार सांगतात. संतोष न्याहळदे, देविदास न्याहळदे, दत्तू न्याहळदे, गोटू न्याहळदे यांचे ते आई-वडील, तर जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांचे ते आजी-बाबा होते.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका समर्पित पतीने आपल्या पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने पती-पत्नीच्या अतूट बंधनाच्या व समर्पणाच्या चर्चेसह गावात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अहिल्यादेवी चौकात राहणारे, वारकरी संप्रदायाचे सामाजिक कार्यकर्ते कै.तुकाराम हिराजी न्याहळदे (वय-95) व कै.सारजाबाई तुकाराम न्याहळदे (वय-85) या दाम्पत्याच्या समर्पणाची ही भावनिक कथा!

पतीस पत्नीवियोगच असह्य...
नुकतेच 11 डिसेंबरला सारजाबाई तुकाराम न्याहळदे (वय-85) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दहाव्या दिवशी त्यांचे उत्तरकार्यही निश्चित झाले होते. परंतु त्यापूर्वीच पत्नीचा विरह सहन न झाल्याने शुक्रवारी (ता.14) दुपारी सव्वा चारच्या सुमारास कै.तुकाराम न्याहळदे यांनीही जगाचा अखेरचा निरोप घेतला. शनिवारी (ता.15) सकाळी अकराला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे गोटू न्याहळदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

वारकरी संप्रदाय व संयुक्त कुटुंबपद्धतीचे प्रचारक दाम्पत्य...
माळमाथा परिसरातील धनगर समाजाचे न्याहळदे दाम्पत्य हे वारकरी संप्रदायाचे व संयुक्त कुटुंब पद्धतीचे प्रचारक व प्रसारक होते. शेतीसह मेंढीपालन हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. शून्यातून विश्व निर्माण करून कृतीतून कठोर परिश्रमाचा संदेश दिला. चार मुले व तीन मुलींसह सुना-नातवंडांचा संयुक्त परिवार यशस्वीपणे सांभाळत संयुक्त परिवाराचा प्रचार व प्रसार केला. आपल्या संपर्कात येणाऱ्या आबालवृद्धांसह प्रत्येकाशी ते "राम-कृष्ण हरी" या उक्तीने संवाद साधत असत.

दोन मुलांवर जलदानासह 'अग्निडाग' देण्याची वेळ...
मयत मातापित्यांना जलदानासह अग्निडाग देण्याची वेळ दोन्ही लहान मुलांवर आली. गोटू न्याहळदे या लहान मुलाने आईला अग्निडाग दिला, तर तिसऱ्या क्रमांकाचा दत्तू न्याहळदे हा मुलगा उद्या वडिलांना अग्निडाग दिला देणार आहे. मोठी दोन्ही मुले संतोष न्याहळदे व देविदास न्याहळदे यांनीही अंतिम समयी आई-वडिलांची मनोभावे सेवा केली. चारही मुलांनी आई-वडिलांनी कधीच ओझे समजले नाही.

पती-पत्नीचे एकाच दिवशी उत्तरकार्य...
न्याहळदे दाम्पत्याचा दशक्रिया विधी हा अनुक्रमे मृत्यूच्या दहाव्या दिवशी होणार असून उत्तरकार्य मात्र कै.तुकाराम न्याहळदे यांच्या दशक्रियेच्या दिवशी अर्थात एकाच दिवशी होणार आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही पती-पत्नी एकमेकांशी मित्र-मैत्रिणींसारखे वागत असल्याने तरुण पिढीसह इतरांनाही त्यांचा हेवा वाटत असे. त्यांचे आयुष्यात कधीच भांडण व मतभेद झाले नसल्याचे जुने जाणकार सांगतात. संतोष न्याहळदे, देविदास न्याहळदे, दत्तू न्याहळदे, गोटू न्याहळदे यांचे ते आई-वडील, तर जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांचे ते आजी-बाबा होते.

Web Title: husband dead after wife dead in dhule

टॅग्स