
Nandurbar Crime : अक्कलकुवा तालुक्यातून जाणाऱ्या नेत्रंग-शेवाळी महामार्गावर डोगरीपाडाजवळील हॉटेल दूर्वा ढाबा व कोराईजवळील हॉटेल रामदेवजी राजस्थानी ढाबा येथे विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांच्या विशेष पथकाने छापा टाकून आरोपीसह मुद्देमाल जप्त केला आहे.
दूर्वा ढाबा येथे १५ लाख किमतीचे बायोडिझेल साधारण इंधन भरलेले २९ हजार १३० किलोग्रॅम वजनाचे टँकर (जीजे ०३, बीडब्ल्यू ०८०३), ११ लाख ८० हजार किमतीच्या २७ हजार लिटर क्षमतेच्या भूमिगत टाकीत १५ हजार लिटर इंधन, चार लाख किमतीची १५ हजार लिटर क्षमतेची भूमिगत टाकी, त्यात पाच हजार लिटर बायोडिझेलसदृश इंधन, एक लाख चार हजार किमतीचे डिजिटल नोझल मशिन, ५०० किमतीचे नरसाळे, नऊ हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
रामदेवजी राजस्थानी ढाबा येथे झालेल्या कारवाईत १५ लाख किमतीच्या कंटेनर (पीबी १३, बीएफ ९८२६)मध्ये बायोडिझेलसदृश इंधन भरताना १७ हजार २५० किलोग्रॅम वजनाचे अबसोलेक बॅग, तीन लाख ९८ हजार किमतीची १० हजार लिटर क्षमतेची पाच हजार लिटर बायोडिझेलसदृश इंधन भरलेली टाकी, एक लाख चार हजार रुपये किमतीचे नोझल मशिन, १० हजार रुपये किमतीची मोटर आणि पाइप, १७ हजार ३१० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आले.
पोलिस महानिरीक्षक विशेष पथकाच्या पोलिस शिपाई रवींद्र पाडवी यांनी फिर्याद दिली. संशयित आरोपी हर्ष किशोरभाई छोडवडिया (वय २४, रा. अरोणीयाला, ता. मेंदोरडा, जि. जुनागड, गुजरात), जयेशकुमार छगनभाई वसावा (२७, रा. बंगला फलऊ, टावल, ता. सागबारा, जि. नर्मदा, गुजरात), अनिलभाई भिकूभाई पडेचा (४०, रा. रघुवीर पार्क, जुना मोरबी रोड, बी.नं. ५ वर्षा प्रिंटसमोर, राजकोट, गुजरात), टँकर (जीजे ०३, बीडब्ल्यू ०८०३ वरील चालक), डिंपल चौधरी (रा. अक्कलकुवा, जि. नंदुरबार), अतुलभाई भंडेरी (रा. सुरत, गुजरात), ईश्वरभाई केशारराम चौधरी (३३, रा. सोलंकीनगर, खापर (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार), आनंद पवनकुमार जैन (३४, रा. सोनिपत, हरियाना,
ह. रा. रामदेवाबाबा ढाबा, खापर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार), लियाकत खान राज खान (३२, रा. भडकली, ता. मेवात, जि. नुहू हरियाना (कंटनेर पीबी १३, बीएफ ९८२६ वरील चालक), अनिलभाई (रा. मुंद्रा, गुजरात) हे नऊ जण संगनमत करून लोखंडी व प्लॅस्टिकच्या टाक्यांमध्ये बायोडिझेलसदृश ज्वालाग्रही द्रव्याचा साठा करून वैद्यमापन अधिकृत नसलेल्या मशिनच्या सहाय्याने बाहेर काढून विनापरवाना बेकायदेशीररीत्या विक्री करताना मिळून आले.
तसेच संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारची आगप्रतिबंधक उपाययोजना केली नसल्याने अक्कलकुवा पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार आमश्या पाडवी यांनी केली होती तक्रार
नंदुरबार जिल्ह्यात अवैध व्यवसाय सर्रास सुरू असल्याचा आरोप आमदार आमश्या पाडवी यांच्याकडून वारंवार करण्यात येत होता. अवैध व्यवसाय व अमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार पाडवी यांनी मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यानंतरही कोणतीही हालचाल झालेली दिसून आली नाही.
जिल्हाभरात सुरू असलेले अवैध व्यवसाय व बोगस अमली पदार्थ विक्री बंद व्हावी यासाठी शिवसेना ठाकरे व आमदार आमश्या पाडवी यांनी थेट बुधवारी (ता. २०) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले व तत्काळ कारवाई न झाल्यास २७ सप्टेंबरपासून अक्कलकुवा तालुक्यातील नेत्रंग-शेवाळी महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परिणामी गुरुवारी (ता. २१) रात्री अक्कलकुवा तालुक्यातील अवैध बायोडिझेलसदृश इंधन विक्रेत्यांवर नाशिक पोलिस दलाच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली.