अवैध वाळू वाहतूक करणाऱया ट्रॅक्टरने महिलेला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

शिरपूर (धुळे) : भरधाव वेगात जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरने चिरडल्याने कलाबाई सुदामसिंह राजपूत (49) ही महिला ठार झाली. हा अपघात आज (मंगळवार) पहाटे पाचला जातोडे (ता. शिरपूर) येथे घडला.

शिरपूर (धुळे) : भरधाव वेगात जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरने चिरडल्याने कलाबाई सुदामसिंह राजपूत (49) ही महिला ठार झाली. हा अपघात आज (मंगळवार) पहाटे पाचला जातोडे (ता. शिरपूर) येथे घडला.

उप्परपिंड (ता. शिरपूर) येथील तापी नदीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीने आधीच त्रस्त असलेल्या ग्रामस्थांचा संयम या अपघातानंतर सुटला. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्याचवेळी वाळू वाहतूक करणारी चार ट्रॅक्टर्स तेथून जात असताना ग्रामस्थांनी ताब्यात घेतली. याबाबत माहिती मिळताच एका मोटारीमधून आलेले पाच ते सहा जण तलवार, काठ्या घेऊन ट्रॅक्टर सोडवण्यासाठी जातोडे येथे पोहचले. मात्र जमावाने उग्र रूप धारण केल्याचे पाहून त्यांनी पळ काढला. पळून जाणाऱ्या एकाची दुचाकीही जमावाच्या तावडीत सापडली. सर्व वाहनांची तोडफोड करून एक ट्रॅक्टर व दुचाकी जमावाने पेटवून दिली.

प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, डीवायएसपी संदीप गावित, निरीक्षक शिवाजी बुधवंत, सांगवीचे सहायक निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांना संयम राखण्याचे आवाहन केले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा अशी मागणी करून स्थानिक महसूल यंत्रणा वाळू माफियांशी हितसंबंध राखून असल्याने त्यांच्यावर विश्वास उरला नसल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. उशिरापर्यंत मृतदेह नातलगांनी ताब्यात घेतला नव्हता. मृत कलाबाई राजपूत या उकिरड्यावर कचरा टाकण्यासाठी गेल्या असताना हा अपघात घडला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sand transport tractor crushed a woman at dhule