सापांच्या वारूळांमध्येही वाढली उष्णता 

varul
varul

चाळीसगाव : वातावरणातील वाढते तापमान माणसांप्रमाणेच बिळांमध्ये राहणाऱ्या सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांनाही आता असह्य होऊ लागले आहे. उष्णतेमुळे स्वतःला थंडगार ठेवण्यासाठी विशेषतः वेगवेगळ्या जातीचे साप बिळांमधून बाहेर पडत असून निवाऱ्यासाठी सुरक्षित जागांचा शोध घेत आहेत. त्यामुळे साप सुरक्षितरीत्या पकडून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणाऱ्या स्थानिक सर्पमित्रांना साप पकडण्यासाठीचे ‘कॉल’ वाढलेले दिसून येत आहेत. 

जून महिना सुरू होऊनही अद्याप वातावरणातील उष्णता कमी झालेली नाही. सकाळी आठपासून निर्माण होणारा उकाडा रात्री उशिरापर्यंत कायम असतो. वाढत्या उन्हामुळे जमीन मोठ्या प्रमाणावर तापत आहे. त्याचा परिणाम जमिनीला असलेल्या बिळांमध्येही उष्णता वाढत आहे. त्यामुळे बिळांमध्ये राहणारे विविध जातींचे साप बाहेर पडताना दिसत आहेत. शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने विशेषतः प्लॉट परिसरात साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय शहरातील जुन्या भागात नदी किनाऱ्याच्या परिसरातही सापांचा वावर वाढला आहे. परिसरात नाग, मण्यार, घोणस व पुरसे या चार प्रकारच्या विषारी सापांचा सर्वाधिक वावर आहे. यासोबतच कवड्या, गवत्या, तस्कर, दिवड, धामण यासारख्या बिनविषारी सापांचाही बिळांमध्ये रहिवास आहे. वाढत्या उष्णतेमुळे बिळांमध्ये राहणाऱ्या सापांना असह्य होत असल्याने ते ओलसर जागा शोधण्यासाठी बिळांच्या बाहेर येऊन घरांच्या भिंतीजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, गटारींमध्ये, घरांमध्ये सुरक्षित जागांचा शोध घेत आहेत. त्यामुळे साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. साप पकडण्यासाठी तालुक्यातून सर्पमित्रांना बोलवणी होत आहे. येथील सर्पतज्ज्ञ राजेश ठोंबरे यांनी देखील याला दुजोरा दिला असून कोणालाही साप आढळून आल्यास, त्यांनी त्याला न मारता स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन ठोंबरे यांनी केले आहे. 

वारुळे झाली कमी 
शहराच्या वाढत्या विस्तारामुळे झाडांची तोडही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा परिस्थितीत सापांसाठी सुरक्षित असलेली वारुळे दिसणे बंद झाले आहे. राहणे आणि खाणे या दोनच गरजा सापांच्या असतात, त्यामुळे सापांना राहण्यासाठी सुरक्षित जागांचा अभाव असल्याने ते घरांच्या परिसरात आढळून येतात. वास्तविक, सापाला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. शिवाय भगवान शंकराचा अवतार म्हणून नागाची आजही पूजा केली जाते. त्यामुळे सापांना कोणीही मारु नये. शहरासह तालुक्यातील विविध भागात सर्पमित्रांनी पकडलेले साप वन विभागाच्या सहकार्याने गौताळा अभयारण्यात सुरक्षितरीत्या सोडले जातात. सापांची सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याने सर्पमित्रांना सहकार्य करावे, असेही आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. 

आपल्या परिसरात विषारी व बिनविषारी अशा दोन्ही प्रकारचे साप आढळून येतात. त्यामुळे साप दिसल्यावर त्याला मारणे अथवा पकडण्याच्या मोह कोणीही करू नये. त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून सर्पमित्रांना संपर्क केल्यास त्या सापाचा व त्यातून आपलाही जीव वाचवण्यास मदत होईल. 
- राजेश ठोंबरे, सर्पतज्ज्ञ, चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com