आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर नाशिकमध्ये उभारणार - नारायण शेलार

राजेंद्र बच्छाव
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

प्रेसिडेन्शिअल सूट
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेले सर्व प्रोटोकॉल पाळत तयार करावे लागणारे प्रेसिडेन्शिअल सूट असणारे शहरातील हे एकमेव हॉटेल आहे. सातव्या मजल्यावर असलेल्या या सूटची रचना आणि सजावट म्हणजे हॉटेलला मिळालेला पुरस्कार किती सार्थ आहे, याची साक्ष देतात. आज पंतप्रधान, राष्ट्रपती अथवा एखादे देशाचे राष्ट्रप्रमुख यांना शहरात मुक्कामी राहायचे असेल तर त्यांच्या सुरक्षा आणि इतर बाबींची व्यवस्था लक्षात घेता संबंधित सुरक्षा यंत्रणा एक्‍स्प्रेस इनची निवड करतील यात शंका नाही. भविष्यात जवळच विविध समारंभ, मेळावे, विवाह, पुरस्कार सोहळे आदींसाठी लागणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा मानस असून, ते दोन वर्षांत शहराच्या सेवेत दाखल होईल, असा विश्‍वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.

इंदिरानगर - दहा वर्षांपूर्वी नाशिक शहरात हॉटेल व्यवसायात ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. सहनशीलता, कोणतीही परिस्थिती शांत मनाने हाताळण्याची सवय, सातत्याने धरलेली गुणवत्तेची आस आणि झालेल्या चुकांमधून शिकत आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या भारतातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकित (थ्री स्टार) हॉटेलच्या पुरस्कारापर्यंत पोचून हॉटेलसह नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचविल्याचा जास्त आनंद झाला. या पुरस्काराने आता जबाबदारी वाढल्याची जाणीवदेखील आहे, अशा शब्दांत हॉटेल एक्‍स्प्रेस इनचे व्यवस्थापकीय संचालक नारायण शेलार यांनी ‘सकाळ’शी बोलताना त्यांचा यशाचा आलेख सादर केला.

श्री. शेलार कुटुंबीय मूळचे पाचोरे (जि. जळगाव)चे. वडील आनंदा शेलार यांच्या व्यवसायानिमित्त मुंबईला स्थलांतरित झाले. शिक्षणासोबतच छोटेखानी बांधकाम व्यवसाय केला. व्यवसाय कोणताही करा मात्र त्यातील सेवाभावी वृत्ती जपली तर यश मिळेल. ही वडिलांची शिकवण. बंधू संतोष, हरी आणि लक्ष्मण हेदेखील यात आले. अत्यंत सचोटीने व्यवसाय केला.

मुंबईत असल्याने हॉटेल व्यवसायाचे आकर्षण निर्माण झाले. त्याची सुरवात म्हणून घोडबंदर येथे छोटेखानी व्यवसायाने सुरवात केली. दरम्यान, स्नेही किशोर सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेतून नाशिकमध्ये हॉटेलचा निर्णय घेतला. १ मे २००९ ला पांडवलेण्याजवळ एक्‍स्प्रेस इनचे उद्‌घाटन केले. १०० अद्ययावत रुम्सची सोय केली. त्याला पारंपरिक लुक दिला. ग्राहकांचे समाधान आणि गुणवत्तेत तडजोड करायची नाही. हे सूत्र कायम ठेवले.

आता कुटुंबातील भावंडांची मुले विशाल, विकास, आकाश, प्रकाश, दीपक आणि अक्षय याच क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण घेत सोबत आली. इतर मुले इतरत्र, तर एक्‍स्प्रेस इनच्या व्यवस्थापनात माझा मुलगा विकास सोबत आहे. दोनच वर्षांत हॉटेलचे विस्तारीकरण करण्यात आले. आज येथे १९८ खोल्या आहेत. ४०० कर्मचारी आहेत. हॉटेलचे व्यवस्थापक रवींद्र नायर दीर्घ अनुभवी आहेत. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, अलिया भट यांच्यासह सिनेजगतातील अनेक जणांनी येथील पाहुणचार घेतल्यानंतर दिलेली पावती मोलाची आहे. सचिन यांनी तर हॉटेलची मटण रारा या डिशची रेसिपी मागून घेतली आहे. राज ठाकरे, सुशीलकुमार शिंदे आदींसह अनेक पक्षांच्या नेत्यांचे हे कायमचे डेस्टिनेशन झाले आहे. अमेरिकेतील प्रीफर्ड हॉटेल्स या जगभरातील ७५० हॉटेल्सच्या चेनसोबत हॉटेलचा टायअप आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेल इंडस्ट्री सध्या कुठे आहे याची दररोजची अपडेट मिळत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Convention Center to be set up in Nashik Narayan Shelar