सकाळी अंत्यसंस्कार सायंकाळी "पॉझिटिव्ह' ;जळगावात आणखी एक "कोरोना'ने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

मृताच्या कुटुंबातील सहा सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून, मृताला पॅरेलिसिस झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय (कोव्हीड रुग्णालयात) उपचारार्थ दाखल करण्यात आले. आता मृत रुग्णाला बाधा नेमकी कोणत्या ठिकाणी आणि कोणापासून झाली हे सांगता येणे कठीण असून, उपचारादरम्यानच लागण झाल्याची शक्‍यता निकटवर्तीयांनी व्यक्‍त केली आहे.

जळगाव, : शहरातील सम्राट कॉलनीतील 44 वर्षीय प्रौढाचा आज जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयाच्या निर्देशानुसार कुटुंबीयांनी रुग्णालयातूनच अंत्ययात्रा नेऊन नेरिनाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसस्कार केले. अंत्यसंस्कारानंतर सायंकाळच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयास "कोरोना' तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात त्यांना लागण झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी सायंकाळीच सम्राट कॉलनी परिसर पूर्णत: निर्जंतुक केला असून, त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

शहरातील अजिंठा चौकात वेल्डिंग व्यवसाय करणाऱ्या 44 वर्षीय प्रौढाला पंधरा दिवसांपूर्वी पॅरेलेसिसचा (पक्षाघात) झटका आल्याने त्यांना पंचमुखी हनुमान मंदिराजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावून त्यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांच्या निर्देशानुसार कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयातूनच अंत्ययात्रा काढली. नेरीनाका स्मशानभूमीत त्यांच्यावर मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा रुग्णालयाने त्यांचा "कोरोना' संशयित म्हणून स्वॅब संकलित केला होता. त्याचा तपासणी अहवाल सायंकाळी आल्यावर मृताला "कोरोना'ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने सम्राट कॉलनी परिसराला निर्जंतुकीकरणास प्रारंभ केला असून, पोलिसांनी चारही बाजूने परिसर "सील' केला होता. 

उपचारादरम्यानच लागण झाल्याचा संशय 
मृताच्या कुटुंबातील सहा सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून, मृताला पॅरेलिसिस झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय (कोव्हीड रुग्णालयात) उपचारार्थ दाखल करण्यात आले. आता मृत रुग्णाला बाधा नेमकी कोणत्या ठिकाणी आणि कोणापासून झाली हे सांगता येणे कठीण असून, उपचारादरम्यानच लागण झाल्याची शक्‍यता निकटवर्तीयांनी व्यक्‍त केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon corona possitive aafter funeral