जळगाव: पावसाच्या बरसणाऱ्या सरी, त्यात ढोल-ताशांचा गजर अन् ‘मच गया शोर सारी नगरी’च्या गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणाईसह गोविंदा पथकातील युवक-युवतींचा दहीहंडी फोडण्याचा थरार शुक्रवारी (ता.१६) रात्री जळगावकरांनी अनुभवला. शहरात सुभाष चौकातील मानाची दहीहंडी सात थर लावून श्रीकृष्ण मित्रमंडळाने फोडली अन् एकच जल्लोष पाहायला मिळाला. महापालिकेजवळील भगवा चौकात शिवसेनेच्या युवा सेनेची निष्ठेची व प्रभात चौक मित्र मंडळाच्याही दहीहांडीत उत्साह दिसला. उपनगरांतही दहीहंडीचा थरार दिसून आला.