जळगावचे "गांधीतीर्थ' व्हाया मुंबई पोहोचले कॅनडा! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

मनात तयार होणाऱ्या प्रतिमांना चित्ररूप देताना सभोवतालची सृष्टी पाहताना निसर्गाने बहाल केलेल्या विविध रंगछटा कागदावर चितारून सुबक चित्र चित्रकार साकार करत असतो. जळगावचे कलाकार आनंद पाटील यांनी उत्कृष्ट असे महात्मा गांधीजींच्या विचारांशी जवळीक निर्माण करणारे "गांधीतीर्थ' जलरंगातून चित्ररूपात व्यक्त केले आहे. गांधीतीर्थ नेमके काय आहे, याची यथार्थ अनुभूती मुंबईकरांना देण्यासाठी त्यांचे चित्रप्रदर्शन नुकतेच मुंबईतील आर्ट प्लाझा गॅलरीत पार पडले. कॅनडामधील मॉंट्रियाल शहराच्या निवासी पूजा साई यांनी या प्रदर्शनाला भेट दिली व त्यातील निवडक चित्रे विकत घेतली.

मनात तयार होणाऱ्या प्रतिमांना चित्ररूप देताना सभोवतालची सृष्टी पाहताना निसर्गाने बहाल केलेल्या विविध रंगछटा कागदावर चितारून सुबक चित्र चित्रकार साकार करत असतो. जळगावचे कलाकार आनंद पाटील यांनी उत्कृष्ट असे महात्मा गांधीजींच्या विचारांशी जवळीक निर्माण करणारे "गांधीतीर्थ' जलरंगातून चित्ररूपात व्यक्त केले आहे. गांधीतीर्थ नेमके काय आहे, याची यथार्थ अनुभूती मुंबईकरांना देण्यासाठी त्यांचे चित्रप्रदर्शन नुकतेच मुंबईतील आर्ट प्लाझा गॅलरीत पार पडले. कॅनडामधील मॉंट्रियाल शहराच्या निवासी पूजा साई यांनी या प्रदर्शनाला भेट दिली व त्यातील निवडक चित्रे विकत घेतली. अशा तऱ्हेने जळगावचे "गांधीतीर्थ' चित्ररूपाने कॅनडात पोहोचले, हा एक प्रकारे कलेचा सन्मानच म्हणावा लागेल. 

"गांधीतीर्थ' चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ जाहिरात तज्ज्ञ आनंद गुप्ते आणि मुंबई येथील सर जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याता जॉन ड्‌गल्स यांच्याहस्ते झाले. एकूण 18 चित्रे या प्रदर्शनस्थळी लावण्यात आली होती. जळगाव येथील जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरातील 'गांधीतीर्थ' म्युझियम हे गांधी-विचार प्रचार-प्रसाराचे केंद्र आहे. पर्यावरण संरक्षण अहिंसा, शांती, प्रेम यासोबत वैश्विक समाज निर्मिती व्हावी, यासाठी तरुणांमध्ये गांधी विचारांचे संस्कार, आचरण व्हावे, यासाठी "गांधीतीर्थ' विविध उपक्रम राबवीत असते. गांधी विचारांनी प्रेरित होऊन चित्रकार आनंद पाटील यांनी ही चित्रे साकारली आहेत. चित्रातून गांधीतीर्थ अनुभवता यावे, यासाठी "गांधीतीर्थ'च्या विविध भागांत स्वत: बसून त्यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. गेल्या 21 वर्षांपासून आनंद पाटील कलाक्षेत्रात कार्यरत असून, विविध विषयांवर संवेदनात्मक चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. चित्रे व पोस्टर प्रदर्शनाद्वारे जलबचतीचे प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. जलजागृती संदर्भात त्यांचे अभियान जळगाव शहरातील शाळांमध्ये सुरू आहे. पाच ग्रुप, चार सोलो प्रदर्शन यासह त्यांची 75 च्या वर पेंटिंग संग्रहित झाली आहेत. आर्ट-प्लाझा येथील चित्रप्रदर्शनाला अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि जवळपास 1200 कलारसिकांनी देऊन गांधीतीर्थ समजून घेतले व आपले मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर, प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे, वि. दे. सलामे, नरेंद्र विचारे, आर्ट प्लाझाचे चेअरमन अमन ए, सोमाणी कुमकुम आदींनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. 
जळगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती, जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेले "गांधीतीर्थ'ची साक्षात अनुभूती आनंद पाटील यांनी मुंबईकरांना या चित्रांच्या माध्यमातून घडविली. आठवडाभर चाललेल्या या प्रदर्शनाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. या दरम्यान मुंबईला आलेल्या व हल्ली मॉंट्रियाल, कॅनडा येथे वास्तव्यास असलेल्या पूजा साई यांनी प्रदर्शनातील निवडक चित्रे विकत घेणे हे गांधीजींच्या विचारांचा देशविदेशात अजूनही पगडा असल्याचे द्योतक आहे. 
सामान्यांमध्ये असलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून असामान्य कार्य घडविणे, हा जैन इरिगेशनचे संस्थापक मोठ्याभाऊंचा अलौकिक गुण अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्यातही पुरेपूर उतरला आहे. जैन इरिगेशनमध्ये कार्यरत चित्रकार आनंद पाटील यांच्या प्रदर्शनाबद्दलच्या संकल्पनेस पाठिंबा देऊन, आवश्‍यक तेवढ्या सगळ्या बाबींची पूर्तता अशोकभाऊंनी करून दिली. 
जळगावच्या जैन हिल्स स्थित गांधीतीर्थ म्युझियमचे क्षेत्र 80 हजार वर्ग फूट आहे. याचे विशाल प्रांगण 300 एकराच्या हिरवळीने नटलेले आहे. आनंद पाटील यांनी या म्युझियमचे चित्र आपल्या कलाकृतीतून कागदावर साकारले. त्याचे प्रदर्शन मुंबईकरांना पाहता आले. महात्मा गांधीजी स्वातंत्र्यलढ्यात असतानाही विश्वात पोहोचले होते आणि आज या पेन्टिंग्जच्या माध्यमातूनही सातासमुद्रापार कॅनडात जाऊन पोहोचले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon jain gandhitirth penting canda