यंदा अत्तराच्या सुंगधाविनाच "ईद' ;"कोरोना'मुळे घरातच होणार नमाज अदा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

ईदच्या नमाजासाठी मुस्लिमबांधव ईदगाहमध्ये एकत्र येतात, ईदसाठी नवीन कपडे, अत्तराचा सुगंध लावण्याची (सुन्नत) प्रथा आहे. यंदा मात्र बाजारपेठा बंद, उद्योग-व्यवसाय बंद असल्याने नवे कपडे खरेदी होऊ शकली नाही. परिणामी जुन्या कपड्यांवरच मुस्लिमबांधवांना ईदची नमाज अदा करावी लागेल. सोबतच अत्तरचा सुंगधही दरवळणार नाही. 

जळगाव ; मुस्लिम बांधवांचा वर्षातील एकमेव मोठा सण रमजान ईद येत्या 25 मेस साजरा होत आहे. देशावर घोंघावणाऱ्या "कोरोना'च्या महामारीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून धंदा-व्यवसाय पूर्णत: बंद असून, बाजारपेठाही बंदावस्थेत आहेत. महिनाभराचे रोजे पूर्ण होऊन येणाऱ्या ईदसाठी प्रत्येक कुटुंबात मोठी खरेदी होऊन सण साजरा होतो. ईदच्या खरेदीत अत्तराचाही मोठा वाटा असतो. नवीन कपड्यांसह वेगवेगळ्या अत्तरांचा सुगंध विशेष असतो. यंदा मात्र मुस्लिमबांधव घरी राहूनच ईद साजरा करणार असल्याने अत्तराचा सुगंध यावर्षी दरवळणारच नाही. 
यंदा मार्चपासून शहरातील सर्व बाजारपेठा, उद्योगधंदे पूर्णपणे बंद आहेत आणि 31 मेपर्यंत अशीच स्थिती राहणार असून, मुस्लिमबांधवांना ईद घरी राहूनच साजरा करावा लागणार आहे. ईदसाठी महिनाभरापासून तयारी सुरू असते. महिन्याचे रोजे पाळल्यानंतर ईद साजरी होते. त्यासाठी नवीन कपडे, बूट, चप्पलसह इतर आवश्‍यक सर्व साहित्याची मोठी खरेदी होते. बाजारातही कोट्यवधीची उलाढाल या काळात होते. यावर्षी मात्र "कोरोना'मुळे लॉकडाउन असल्याने कामधंदे पूर्णत: बंद आहेत. परिणामी नागरिकांच्या हाती पैसा नाही. बाजारपेठा बंद असल्याने खरेदी होणार नाही. जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने ईदची नमाज आणि उत्साह घरात राहूनच साजरा करायचे निर्देश जारी केल्याने ईद होईल मात्र ती केवळ नावालाच, अशी स्थिती संपूर्ण देशभर आहे. 

अत्तराचा तो सुंगध पारखा 
ईदच्या नमाजासाठी मुस्लिमबांधव ईदगाहमध्ये एकत्र येतात, ईदसाठी नवीन कपडे, अत्तराचा सुगंध लावण्याची (सुन्नत) प्रथा आहे. यंदा मात्र बाजारपेठा बंद, उद्योग-व्यवसाय बंद असल्याने नवे कपडे खरेदी होऊ शकली नाही. परिणामी जुन्या कपड्यांवरच मुस्लिमबांधवांना ईदची नमाज अदा करावी लागेल. सोबतच अत्तरचा सुंगधही दरवळणार नाही. 

चंद्रदर्शन न झाल्याने ईद सोमवारी 
जळगाव रूहते हिलाल कमिटीची सभा ईदगाहच्या सभागृहात शहर ए काजी मुफ्ती अतीकुर्रहमान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात जळगावात अथवा इतरत्र कोठेही चंद्रदर्शन न झाल्याने ईदची नमाज सोमवारी (25 मे) होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सभेत ट्रस्टचे अध्यक्ष अल्हाज अब्दुल गफ्फार मलिक, मुफ्ती अबुजर, मुफ्ती हंजला, मुफ्ती अबुजर, मौलवी नदीम अख्तर आदींची उपस्थिती होती. 

ईदची नमाज घरातच 
हिलाल समितीचे सर्व व सन्माननीय उलमा, अलीम व मौलवींना मुफ्ती अतीकुर्रहमान तसेच ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक, सचिव फारुक शेख यांनी मुस्लीम समुदायांना आव्हान केले आहे की नमाज आपापल्या घरीच अदा करावी, कोणीही ही ईदगाह मध्ये येता कामा नये तसेच कोणीही रस्त्यावर येऊन ईदच्या शुभेच्छांसाठी गर्दी करू नये एकमेकास गळाभेट अथवा हस्तांदोलन (मुसाफा) घेऊ नये आपली स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी विशेष प्रार्थना करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news ; eid in home