जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांतील अतिक्रमणांवर हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार प्रशासनाने मंगळवारी कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्यावरील 74 दुकानांचे रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढले. काही ठिकाणी पथकातील कर्मचाऱ्यांशी व्यावसायिकांना वाद घातल्याने गोंधळ निर्माण झाला होता. 

जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार प्रशासनाने मंगळवारी कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्यावरील 74 दुकानांचे रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढले. काही ठिकाणी पथकातील कर्मचाऱ्यांशी व्यावसायिकांना वाद घातल्याने गोंधळ निर्माण झाला होता. 

शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात गणेश कॉलनी ते कोर्ट चौक या रस्त्याला सुरवात झाली. सायंकाळपर्यंत सुमारे 74 दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. यात अनेकांचे पक्के बांधकाम केलेले ओटे, पत्र्यांचे शेड, गटारांवरील ढापे तोडण्यात आले. तसेच काही अतिक्रमणधारकांनी यावेळी स्वत:हुन आपले अतिक्रमण काढून घेतले. 

पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद 
अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू असताना काहींनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. यादरम्यान, अतिक्रमण निर्मूलन पथकाशी काही दुकानदारांचा शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला. 

उपायुक्त मुठे यांची उपस्थिती 
शहरातील प्रमुख रस्त्यांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आज उपायुक्त अजित मुठे यांच्या आदेशाने झाली. त्यानुसार स्वत: उपायुक्त मुठे कारवाई प्रसंगी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नगररचना विभागाचे इस्माईल शेख, अतुल पाटील, समीर बोरोले, अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान आदी पथकातील कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित होते. 

कारवाई सुरूच राहणार 
गणेश कॉलनीपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरवात झाली असून ही कारवाई थेट चित्रा चौकापर्यंत होणार आहे. यामध्ये कोणाचेही अतिक्रमण सुटणार नाही, तसेच कोणी हस्तक्षेप केला, तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त अजित मुठे यांनी दिला आहे. तसेच या पुढेदेखील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news encroachments main roads in Jalgaon city