रेल्वे पुलाखालून जाण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

पावसाळ्यात या पुलाखाली देखील पाणी साचत असताना स्कूल बस देखील या पुलाखालून जात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत बसवून दुसऱ्या बाजूला सोडावे लागण्याची वेळ नेहमीच येत असते. 

जळगाव : चार शाळा, एक महाविद्यालय, वृद्धाश्रम, पार्क यासह दोन गावांमधील नागरिक व विद्यार्थ्यांना गिरणा पंपिंग रस्त्यावरील रेल्वे पुलाखालून जावे लागते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची दुरवस्था असून, शेजारून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी या पुलाखाली बाराही महिने साचलेले असते. बाजूने एक रस्ता असला तरी येथे तिसऱ्या लाइनसाठी पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना थेट नाल्याच्या पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत आहे. 

वाघनगर, जिजाऊनगर, श्‍यामनगर, गजानननगरातून नाल्याचा मार्ग आहे. हा नाला थेट रेल्वेपुलाच्या खालून दुसऱ्या बाजूला निघतो. पुलाचे दोन बोगदे असून, एका पुलाच्या बोगद्यात या नाल्याचे पाणी साचलेले आहे. तर दुसऱ्या बोगदा आता मुरुमाची भर टाकून उंच केला आहे. मात्र, पावसाळ्यात या पुलाखाली देखील पाणी साचत असताना स्कूल बस देखील या पुलाखालून जात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत बसवून दुसऱ्या बाजूला सोडावे लागण्याची वेळ नेहमीच येत असते. 

वाळूच्या डंपर, ट्रॅक्‍टरमुळे बिकट अवस्था 
गिरणा पंपिंग रस्त्याने पुढे गिरणा नदी असून, या नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूचा दिवस-रात्र उपसा सुरू असतो. त्यामुळे वाळूचे अवजड डंपर व ट्रॅक्‍टर या पुलाखालून दिवसरात्र जात असल्याने पुलाखालचा भाग दिवसेंदिवस खोल जात आहे. त्यात नाल्याचे पाणी साचून तलावाचे स्वरूप या पुलाला येत आहे. त्यामुळे या पुलाखालील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण तसेच हा पूल डंपर, ट्रॅक्‍टरांना बंद करावा, अशी मागणी शैक्षणिक संस्थाचालक, शिक्षक, पालक तसेच नागरिकांकडून होत आहे. 

बोगद्याच्या कामास हवी गती 
जळगाव ते मनमाड तिसऱ्या-चौथ्या रेल्वेलाइनचे काम सुरू आहे. त्यात जळगाव-शिरसोली टप्प्याचे काम प्रगती पथावर असून, गिरणा पंपिंग रेल्वेपुलाचे देखील काम रेल्वेने सुरू केले आहे. गेल्या महिन्याभरापासून कामाला सुरवात केली आहे. सध्या पुलाचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या पाईपिंगच्या मशिनद्वारे काम केले जात आहे. परिणामी, अनेकदा रस्ता बंद केला जात असल्याने शाळकरी वाहने, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना साचलेल्या नाल्याच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news girna pumping rod Student workout to get under the train