"मनपा'च्या आकृतिबंधात 167 नवीन पदांची निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

महापालिकेत अनेक जागा रिक्त असल्यामुळे नवीन पदनिर्मितीसाठी 2017 मध्ये महापालिका प्रशासनाने आकृतिबंध तयार केला होता. हा आकृतिबंध तयार 23 जून 2017 मध्ये स्थायी समितीच्या सभेत मांडून त्याला मंजुरी मिळाली होती.

जळगाव : जळगाव महापालिका 2003 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर प्रथम 2017 ला आकृतिबंध तयार करून तो शासनाकडे पाठविला होता. यात एकूण 2 हजार 830 पदांपैकी 962 पदे व्यपगत (लॅप्स) होणार असून, नव्याने 167 पदांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या आकृतीबंधाबाबत आज मुंबईत नगरविकास विभागात बैठक झाली. यात अत्यावश्‍यक सेवा म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे प्रस्तावित करण्याची सूचना नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. 

महापालिकेत अनेक जागा रिक्त असल्यामुळे नवीन पदनिर्मितीसाठी 2017 मध्ये महापालिका प्रशासनाने आकृतिबंध तयार केला होता. हा आकृतिबंध तयार 23 जून 2017 मध्ये स्थायी समितीच्या सभेत मांडून त्याला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर 16 ऑक्‍टोबर 2017 ला महासभेने मंजुरी देवून तो शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठरावानंतर आकृतिबंधाचा प्रस्ताव 20 नोव्हेंबर 2017 मध्ये शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. या प्रस्तावात त्रुटी असल्याचे शासनाने पुन्हा महापालिकेकडे पाठविला होता. या त्रुटींची पूर्तता महापालिका प्रशासनाने पुन्हा 6 जून 2019 मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. 

अत्यावश्‍यक पदे भरा 
महापालिकेने आकृतिबंधात 1129 पदे प्रस्तावित केले आहे. त्यात 962 पदे व्यपगत (लॅप्स) होणार आहेत. त्यामुळे केवळ 167 पदे नव्याने प्रस्तावित आहेत. याबाबत आज नगरविकास विभाग, मुंबई येथे बैठक होती. बैठकीला प्रशासकीय विभागाचे उपायुक्त अजित मुठे उपस्थित होते. उपायुक्तांनी आकृतीबंधबाबत माहिती दिली. यावर 167 पदांव्यतिरिक्त अत्यावश्‍यक सेवा म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांची किती पदे आवश्‍यक आहे. याची माहिती घेऊन नव्याने प्रस्ताव तयार करण्याची सूचना नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला दिली. 

आकृतिबंधात अशी आहेत नवीन पदे 
सामान्य प्रशासन 1222, महसूल 160, लेखाविभाग 25,अभियांत्रिकी 771, आरोग्य 424, अग्निशमन 60 आणि क्रीडा 1 अशी एकूण 2 हजार 663 पदे मंजूर आहेत. त्यानंतर 1 हजार 129 पदे प्रस्तावित करण्यात आली. त्यामुळे 2 हजार 850 पदे झालीत. मात्र, काही पदे कालबाह्य झाल्यामुळे 962 पदे व्यपगत (लॅप्स) होणार असल्याने आता 167 पदांसाठी नव्याने प्रस्ताव तयार केला जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon muncipal corporation 167 new requirement