सत्ताधारी नाही...मग कोण करतय खड्डे बुजविण्याचे काम 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

जळगाव : शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असताना महापालिका प्रशासन मात्र जळगावकरांच्या त्रासाकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे शासनाचा निधी मिळाला असतांना देखील काम होत नाही. मात्र शहरातील रस्ते न बुजविणाऱ्या महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने खड्डे बुजविण्याच्या कामातून चपराक लगावली आहे. तरी देखील प्रशासन अजून हललेले नाही. 

शहराचा एक वर्षात कायापालट करणार या आश्‍वासनावर भारतीय जनता पक्षाने मनपाची सत्ता मिळविली. मात्र शहराचा विकास तर केलाच नाही, उलट शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस थांबल्यावर तातडीने खड्डे बुजविण्याच्या कामास सुरूवात करण्यात येईल असे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी जाहिर केले होते. मात्र अद्यापही कामाला सुरूवात केली नाही. महापालिकेचे अधिकारी अद्यापही सुस्तीत आहेत.तर सत्ताधारी पदाधिकारी विधानसभा निवडणूकीच्या "मोड'मधून बाहेर आलेले दिसत नाही. 

राष्ट्रवादी बुजवतेय खड्डे 
महापालिकेतील सत्ताधारी हातावर हात धरून बसलेले असतांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र शहरात कामाचा धडका सुरू केला आहे. पक्षाचे युवक कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी स्वखर्चाने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. आज त्यांनी पिंप्राळा मार्गावरील रेल्वे गेट ते बजरंग बोगद्यापर्यंतचा नवसाच्या गणपतीच्या मार्गावरील खड्डे बुजविले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

तीन डंपर टाकला मुरूम 
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे काम सुरू असून, लहान खड्ड्यांमध्ये कॉक्रेट टाकून बुजविण्याचे काम होत आहे. परंतु आज पिंप्राळा रेल्वेगेटपासून बजरंग बोगदापर्यंतच्या रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. यासाठी साधारण तीन डंपर मुरूम टाकून त्यावर रोलर फिरवून हे काम करण्यात आला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon muncipal corporation road damage rashtrawadi congress work