हाती "लगाम' ज्याच्या...

विजय बुवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

देशभरात राजकीय सत्ताविस्ताराचा अजेंडा घेऊन निघालेल्या पक्षाला आत्मिक, भावनिक साथ देणे एकवेळ समजू शकते, पण त्यासाठी उथळ, अविचारी वक्तव्यांचा आधार घेण्याची खरेच गरज आहे का? आणि मग टोकाचा वैचारिक, तात्त्विक विरोध असलेल्यांनीही ज्याचा कधी ना कधी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आदर केला, त्या सेवाभावी, शिस्तबद्ध, रचनात्मक कार्याच्या लौकिकाचे काय? तो किती काळवंडू द्यायचा, याचा विवेक-विचार संघाकडून होईलच याची शाश्‍वती नाही. असे असले तरी "राजसूय'साठी चौखूर उधळलेल्या अश्‍वाला कुणी रोखू नये, यासाठी त्याची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात त्या अश्‍वामागे आपण किती फरपटायचे, याची जाणीव "लगाम' हाती असलेल्यांना तरी असायलाच हवी...

काही जणांना युद्धाच्या कथा सांगण्यात, तर काहींना त्या थेट घडवण्यातच रस असतो. ज्यांना युद्धाची कथा घडवायची आहे, त्यांना आपण अशा प्रसंगाला सामोरे जाण्यास सिद्ध असल्याचे दाखवावे लागते.

मग एखाद्या लहान-मोठ्या लढाईची जराशी चाहूल लागली, तरी त्यांच्या दंडबैठका सुरू होतात. युद्धभूमी कुठलीही असो; रणभेरी वाजू लागली, की त्यातील अनेकांचे बाहू फुरफुरू लागतात. कारण, त्यांना युद्धाच्या कथेचा नायक होऊन शौर्याचा इतिहास लिहायचा असतो. आता लढाईला सिद्ध व्हायचं, तर त्यासाठी आपल्या पाठी सैन्य हवं. ते असेल तर त्याचा सरावही हवाच! कारण युद्ध जिंकायचं, तर लष्करासारखं अनुशासन अन्‌ युद्धकलेचं प्रशिक्षणही ओघानंच आलं. अनुशासन मजबूत असेल, तर चिंताच मिटली! राहता राहिलं प्रशिक्षण... आधीच तयार असलेल्या अशा आर्मीला फार फार तर तीन एक दिवसांचं ट्रेनिंग मिळालं तरीही भागतं... तेवढं झालं, की हे सैन्य देशरक्षणासाठी शत्रूचा निःपात करून कोणतंही युद्ध जिंकण्यास सिद्ध होतं.

युद्धाची कथा रम्य, रोमांचक असते. म्हणून हे कुणाला ऐकायला एकवेळ बरं वाटेल; पण प्रत्यक्षात हे एवढं सोपं नक्कीच नसतं. देशाच्या रक्षणासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या जवानांची, त्यांच्या वीरतेची तुलना कुणाशी होईलच कशी? आणि ती करायची तरी कशाला..? तरी पण अधूनमधून काहीतरी वादग्रस्त विधाने करायची, त्यातून गदारोळ सुरू झाला की माध्यमांवर खापर फोडायचे, झालंच तर आपण तसे बोललोच नव्हतो, असा पवित्रा घ्यायचा अन्‌ त्या आडून आपल्या मनातला वा अदृश्‍य अजेंड्यावरचा विषय लोकांमध्ये चर्चेला सोडून द्यायचा, असे प्रकार अलीकडे देशाच्या एकूणच सामाजिक- राजकीय जीवनात सातत्याने घडत आहेत. आदर्श व पारदर्शी सामाजिक वर्तनव्यवहाराचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही तोच कित्ता गिरवला जाणे अपेक्षित नसले, तरी तसे घडते आहे आणि सगळेच त्याचे साक्षीदार बनताहेत. देशाच्या लष्कराबद्दल केल्या गेलेल्या वादग्रस्त विधानाची चर्चा याच संदर्भात महत्त्वाची ठरते.

जगातील कोणत्याही देशाच्या नागरिकांइतकाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्तच अभिमान आणि आदर या देशातील लोकांना आपल्या सेनेबद्दल आहे. आपल्या लष्कराच्या धैर्याची, शौर्याची तुलना अन्य कुणाशी होणे, भारतीय मनाला मान्य होऊच शकत नाही. अगदी संघाच्या सेवाकार्याचा आदर करणाऱ्यालाही ते कितपत आवडले असेल, हा प्रश्‍नच आहे. उलट अशा "अडचणी'त टाकणाऱ्या वक्तव्यांवर सफाई देणाऱ्यांना किती शाब्दिक कसरत करावी लागते, याचा तरी विचार व्हायला हवा. पण, कधी अपेक्षित चर्चा घडवण्यासाठी अन्‌ त्यातून अनुकूल सामाजिक वातावरण तयार करण्यासाठी, तर कधी सरकारची प्रतिमा जपण्या वा उंचावण्यासाठी अशी विधाने सोयीसोयीने करण्याची नि ती फिरवण्याची वेळ संघावर सतत येत राहिली, तर एक दिवस त्याच्याच प्रतिमेचा प्रश्‍न निर्माण होईल. त्यावेळी ती सावरायला दुसरा संघ नसेल...

देशकार्याला वाहून घेतलेल्या कुठल्याही व्यक्ती वा संस्था- संघटनेसाठी अनुशासन, राष्ट्रनिष्ठा, समर्पण या गोष्टी खरे तर अंगभूत सामर्थ्याची प्रतीकेच. जशी कर्णाची कवचकुंडलं... निसर्गतःच लाभलेली अन्‌ निर्णायक क्षणी कामी येणारी... पण, आजच्या काळात हे मौलिक अलंकार नुसते अंगाखांद्यावर मिरवून भागत नाही, तर त्यांचं उत्तम "मार्केटिंग'ही करावं लागतं. ते केलं नाही, तर दुसरा कुणी तरी आपणच जास्त अनुशासित अन्‌ देशभक्त आहोत, हे साऱ्या जगाला पटवून देईल.

म्हणून मग अधूनमधून आपल्या या गुणांची ओळख नि जाणीव साऱ्यांना करून द्यावी लागते. वास्तविक, एखाद्या व्यावसायिक संस्था-संघटनेने आपल्या अशा गुणवैशिष्ट्यांची जाहिरातबाजी केली, तर त्यामागील त्यांचा लाभाचा हेतू समजू शकतो. मात्र, समर्पण, राष्ट्रनिष्ठा, शिस्तबद्धता अशा विविध गुणविशेषांच्या पायावर सेवाभावी कार्याची परंपरा निर्माण केलेली संघटना असा लौकिक प्राप्त केलेल्या संघाकडूनही याप्रकारे स्वक्षमतेची जाहीर चर्चा होऊ लागली तर..?

त्यातही आपल्या क्षमतेची तुलना देशाच्या लष्कराशी करीत संघ काय संदेश देऊ अथवा काय साध्य करू इच्छितो, याबाबत नागरिकांच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. पण, त्यांना त्याची समर्पक उत्तरे संघाकडून मिळत नाहीत. सरसंघचालकांनी देशाच्या लष्कराबाबत केलेल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला गेला, त्यांना "तसे' नव्हे तर "असे' म्हणायचे होते, असा खुलासा संघाने नंतर केला. तरी त्यामुळे संभ्रम काही कमी झाला नाही. उलट त्यात भरच पडते आहे.

सध्या देशाच्या केंद्रस्थानी आणि बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. रा. स्व. संघ ही या पक्षाची मातृसंस्था असली, तरी ती अ-राजकीय असल्याचा दावा वारंवार केला जातो. भाजपची ध्येयधोरणे, निर्णय आणि एकूणच राजकीय वाटचाल, यशापयश यांपासून संघ अलिप्त असल्याचेही वेळोवेळी सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र संघ आणि भाजपचा नातेसंबंध कधीही दडून राहिलेला नाही. किंबहुना, भाजपच्या धोरणांचा संबंध नि निर्णयांचे नाते संघाच्या विचारधारेशी मिळतेजुळते असल्याची अनेक उदाहरणे आजवर समोर आली आहेत, आजही येत आहेत, उद्याही येत राहतील. भाजप हे संघाचे राजकीय अंग आहे, हे खरे तर "ओपन सिक्रेट'! ते या देशातील जनतेला माहीत नाही, अशा भ्रमात कुणी "आमचा भाजपच्या ध्येय-धोरणांशी संबंध नाही,' असे सांगत असेल, तर किती गांभीर्याने घ्यायचे, हे लोकच ठरवतील.

पण, विषय या दोहोंतील आंतरसंबंधांइतकाच संघाच्या विधायक वारशाच्या विश्‍वासार्हतेचा आहे. भाजपच्या राजकीय लाभासाठी वा बिकट राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीत त्या पक्षाला "कव्हर' करण्याच्या प्रयत्नात आपली प्रतिमा किती खालवायची? मुळात तसे करण्याची गरज आहे का? कोणत्याही किमतीत देशभरात राजकीय सत्ताविस्तार साध्य करण्याचा अजेंडा घेऊन निघालेल्या पक्षाला आत्मिक, भावनिक साथ देणे एकवेळ समजू शकते, पण त्यासाठी उथळ, अविचारी वक्तव्यांचा आधार घेण्याची खरेच गरज आहे का? आणि मग टोकाचा वैचारिक, तात्त्विक विरोध असलेल्यांनीही ज्याचा कधी ना कधी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आदर केला, त्या सेवाभावी, शिस्तबद्ध, रचनात्मक कार्याच्या लौकिकाचे काय? तो किती काळवंडू द्यायचा, याचा विवेक-विचार संघाने एरवी केलाही असता. पण, आता अथवा नजीकच्या भविष्यात तसा तो होईल की नाही, याची शाश्‍वती नाही. "राजसूय'साठी चौखूर उधळलेल्या अश्‍वाला कुणी रोखू नये, यासाठी त्याची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात त्या अश्‍वामागे आपण किती फरपटायचे, याची जाणीव "लगाम' हाती असलेल्यांना तरी असायलाच हवी...

Web Title: jalgaon news article vijay buva mohan bhagwat rss