व्यवहाराचे वांधे, ‘एटीएम’च कॅशलेस!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

जळगाव - रिझर्व्ह बॅंकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने शहरातील ‘एटीएम’ पुन्हा ‘कॅशलेस’ झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खात्यात पैसे असूनही ते उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून बी-बियाणे खरेदीसाठी शहरात आलेल्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून ‘कॅशलेस’ व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात असले, तरी सर्वसामान्यांच्या मानसिकतेत कॅशलेस व्यवहाराबद्दल बदल झालेला दिसून येत नाही. परिणामी ‘एटीएम’मधून पैसे काढण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे.

जळगाव - रिझर्व्ह बॅंकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने शहरातील ‘एटीएम’ पुन्हा ‘कॅशलेस’ झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खात्यात पैसे असूनही ते उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून बी-बियाणे खरेदीसाठी शहरात आलेल्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून ‘कॅशलेस’ व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात असले, तरी सर्वसामान्यांच्या मानसिकतेत कॅशलेस व्यवहाराबद्दल बदल झालेला दिसून येत नाही. परिणामी ‘एटीएम’मधून पैसे काढण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. दोन तासांत ५२ लाख रुपयांचे ‘ट्रान्झेक्‍शन’ होत असल्याने ‘एटीएम’च कॅशलेस होत आहे. 

नोटा बदलविण्याच्या निर्णयानंतर साधारण दीड- दोन महिन्यांपर्यंत सर्वच बॅंका व ‘एटीएम’च्या बाहेरही लांबचलांब रांगा लागत असल्याचे चित्र होते. नोटबदलीच्या पार्श्‍वभूमीवर डिजिटलकडे वळताना जनतेने आपले बहुतांश व्यवहार ‘कॅशलेस’ करण्याचे आवाहन केंद्र शासनाकडून करण्यात आले होते. सुरवातीचे काही दिवस नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला. मात्र, एटीएममधून रक्‍कम काढण्याची मर्यादा उठविल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती म्हणजे व्यवहार हे रोखीनेच व्हायला लागले. व्यवहार करण्यासाठी आजच्या स्थितीला नागरिक पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’वर जात आहेत. परिणामी ‘एटीएम’मधील कॅश संपून जात असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाहण्यास मिळत आहे.

दोन तासांत ‘एटीएम’मध्ये खडखडाट
दैनंदिन व्यवहार किंवा अन्य कोणताही व्यवहार करण्यासाठी आजही स्वॅप कार्ड किंवा चेकद्वारे व्यवहार करण्याचे प्रमाण कमी आहे. रोखीने व्यवहार होत असल्याने यासाठी लागणारा पैसा काढण्यासाठी नागरिक ‘एटीएम’वर जात आहे. दिवसांतून पाच- सहा वेळेस कॅश टाकल्यानंतर देखील मशिनमध्ये कॅश राहत नसून, एका व्यक्‍तीकडून चाळीस हजार रुपयांपर्यंत कॅश काढली जात आहे. यामुळे दोन तासांत सुमारे ५२ लाख रुपयांचे ‘ट्रान्झेक्‍शन’ होत असल्याचे ‘एसबीआय’कडून सांगण्यात आले. 

रोकडचा पुरवठाही कमी
जिल्ह्यात होणारे व्यवहार लक्षात घेता त्यानुसार रिझर्व्ह बॅंकेकडून स्टेट बॅंकेला रोकडचा पुरवठा केला जात असतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंकेकडून येणारी रोकड कमी असल्याने स्टेट बॅंकेकडून अन्य बॅंकांना दिवसाला केवळ १० ते २० लाख रुपयांची रोकड दिली जात आहे. यामुळेच एटीएममध्ये देखील पुरेशी रक्‍कम टाकली जात नसल्याने काही तासांतच मशिन कॅशलेस होत असल्याचे चित्र आहे.

बहुतांश ‘एटीएम’ बंद, तर काहींवर रांगा
शहरातील बहुतांश बॅंकांचे ‘एटीएम’ शनिवारपासून बंद असल्याचे चित्र आहे. बॅंकांना सलग दोन दिवस सुट्या आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. आज (१२ जून) देखील बहुतांश एटीएम बंद असल्याचे चित्र होते. तर जे मशिन सुरू होते, तेथे पैसे काढणाऱ्यांच्या रांगा लागलेल्या पाहण्यास मिळाल्या. यात स्टेट बॅंक मुख्य शाखेचे एटीएम, आयसीआयसीआय, जळगाव जनता बॅंक, शिरपूर पीपल्स बॅंक, युनियन बॅंकेच्या एटीएमवर गर्दी होती. तर ‘आयडीबीआय’, एचडीएफसी, ॲक्‍सिस बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांचे काही ‘एटीएम’ बंद असल्याने नागरिकांना शोध घेत फिरावे लागत होते.

स्टेट बॅंकेचे एटीएम मशिन कोणत्याही कारणास्तव बंद ठेवण्यात आलेले नसून, मुख्य शाखेतील दोन्ही मशिन सुरूच आहेत.
- एस. बी. गिरीयन, सहा. महाप्रबंधक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news atm cashless