बोगस महाविद्यालय स्थापनकरून  विद्यार्थ्यांची केली फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

बोगस महाविद्यालय स्थापनकरून 
विद्यार्थ्यांची केली फसवणूक 

बोगस महाविद्यालय स्थापनकरून 
विद्यार्थ्यांची केली फसवणूक 

जळगाव : शहरातील भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने अखेर चेतन गुणवंत पाटील (वय 28, रा.भुसावळ) या विद्यार्थ्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेवर कामकाज होऊन अखेर न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात महाविद्यालयाच्या संचालिका शैलजा नितीन पाटील व नितीन पंढरीनाथ पाटील या दोन संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चेतन याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने 18 मार्च 2017 रोजी या महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालय एआयसीटीईशी संलग्न असल्याचे संचालिका पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते. यानंतर चेतन याने वेळोवेळी एकूण 1 लाख 95 हजार रुपये फी भरली. महाविद्यालयाचे लेक्‍चर चिंचोली येथील पी. ई. तात्या पाटील इन्स्टिट्यूट येथे होत असल्याने चेतनसह त्याचे मित्रांना संशय आला. यानंतर पहिले सेमिस्टर परीक्षेच्या निकालानंतर जे गुणपत्रक मिळाले त्यावर "एआयसीटीई'चा शिक्का नव्हता. विद्यार्थ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी नंतर पालकांसह संचालिका पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. तसेच जीवेठार मारण्याचीही धमकी दिली. यानंतर चेतन याने एआयसीटीई, पोलिसांकडे तक्रार केली. "एआयसीटीई'कडे माहितीच्या अधिकारातून अर्ज करून माहिती मिळवली होती. "एआयसीटीई'ने हे महाविद्यालय संलग्न नसल्याचे विद्यार्थ्यांना कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांची फी, कागदपत्रे परत करण्याचेही आदेश केले होते. तरी देखील विद्यार्थ्यांचे पैसे, कागदपत्र दिले नाही. अखेर चेतन याने उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टेक्‍निकल एज्युकेशनला तक्रार.. 
फसवणूक झालेल्या दुसरा विद्यार्थी आकाश दीक्षित याने AICTE ( All India CouncilFor Technical Education ) कडून माहितीचा अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत मिळवलेल्या माहितीवरून मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही संस्था बोगस व मान्यता प्राप्त नसल्याचे कळाल्यावर पालकांसह पैसे परत मागण्यासाठी गेल्यावर त्यांना धमकावण्यात आले. नंतर या प्रकरणी केलेल्या तक्रारीवर AICTE Empowered under section 10 ( n ) of AICTE act अंतर्गत AICTE ने विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रांसह फी परत करण्याचे आदेशित केले होते. मात्र हे आदेशही धुडकावण्यात आले. अखेर पोलिस अधीक्षकांना सूचित करण्यात आल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी फसवणूक झालेल्या विद्यार्थ्याचे "मोडतोड'जबाब नोंदवून घेत आम्ही शिक्षण विभागाचे मार्गदर्शन मागवल्याचे सांगत पिटाळून लावण्यात आल्यावर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. 

गुन्ह्यांची व्यापकता मोठी 
प्राप्त माहिती नुसार मोशन इन्स्टिट्यूट पुणे, बॅंग्लोर येथेही शाखा असून दिल्लीतही अशीच तक्रार दाखल झालेली आहे. एका विद्यार्थ्यांकडून सुमारे 4 लाखांपर्यंत पैसा उकळून त्याला रंगीत झेरॉक्‍स पेपरवर बनावट व खोटी मार्कशीट दिली जाते. अशा जवळपास दहा हजाराच्यावर विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news bogas mahavidyalay fhaswnuk