चाळीसगावला शेतकऱ्यांचा ठिय्या 

गणेश पाटील
मंगळवार, 20 मार्च 2018

उर्वरित रक्कम लवकरच देण्याची ग्वाही 
कांदा व्यापारी अरुण अहिरे यांच्याकडे जवळपास 120 कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपये घेणे होते. यापैकी निम्मी रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ अदा करण्यात आली असून उर्वरित रक्कम काही दिवसातच देण्याची ग्वाही त्यांनी दिल्याने हा प्रश्‍न तूर्त मिटला. अरुण अहिरे हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवकही आहेत.

चाळीसगाव : कांदे विक्रीपोटी शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दिलेले धनादेश न वटल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समिती कार्यालयातच ठिय्या मांडला. काल सायंकाळी पाचला संबंधित व्यापाऱ्याने निम्मे पैसे देण्याचे कबूल केल्याने वाद मिटला. जवळपास महिन्यापासून दिलेले धनादेश वटलेले नसतानाही बाजार समितीने या प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. 

याबाबत माहिती अशी, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड वर्षापासून कांदा खरेदीसाठी स्वतंत्र मार्केट सुरू झाले आहे. सद्यःस्थितीत पन्नास ते साठ कांदा खरेदीदार व्यापारी आहेत. नांदगाव, मालेगावसह तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कांदा विक्रीला आणतात. येथील कांदा व्यापारी अरुण मोतीलाल अहिरे यांनी दीड- दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केल्यानंतर त्यांना त्यांचा मोबदला म्हणून धनादेश दिलेले होते. मात्र, हे धनादेश बॅंकेत न वटल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. धनादेश वटत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापारी अरुण अहिरे यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांचे समाधान केले नाही. घडलेला प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सचिवांच्याही कानांवर घातला. सुमारे 150 शेतकऱ्यांचे धनादेश न वटल्याने अरुण अहिरे यांचा कांदा खरेदीचा परवाना पंधरा दिवसांपूर्वी बाजार समितीने रद्द केला होता. कांदा खरेदीदार आपल्या पैशांची मागणी अरुण अहिरे व बाजार समितीकडे करू लागले. मात्र, वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आज बाजार समितीत धनादेश सोबत घेऊन ठिय्या मांडला. तब्बल महिना ते दीड महिन्यांपासून अडकून पडलेले कांदा विक्रीचे पैसे तत्काळ द्यावेत, अशी मागणी करीत शेतकरी सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत आपल्या मागणीवर ठाम होते. बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, संचालक ऍड. आर. एल. पाटील, बळवंत वाबळे यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांची समजूत घातली. अखेर सायंकाळी व्यापारी अरुण अहिरे यांनी शेतकऱ्यांचे निम्मे पैसे देण्याचे कबूल केल्याने वाद मिटला. 

उर्वरित रक्कम लवकरच देण्याची ग्वाही 
कांदा व्यापारी अरुण अहिरे यांच्याकडे जवळपास 120 कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपये घेणे होते. यापैकी निम्मी रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ अदा करण्यात आली असून उर्वरित रक्कम काही दिवसातच देण्याची ग्वाही त्यांनी दिल्याने हा प्रश्‍न तूर्त मिटला. अरुण अहिरे हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवकही आहेत.

Web Title: Jalgaon news farmers agitation in Chalisgaon