दोनशे रुपयांचे अन्न छत्र, आता दहा हजारांची भूक भागवतोय ;अजिंठा चौकात परप्रांतीय मजुरांसाठी मायेचा आसरा

jalgaon ajanta chauk
jalgaon ajanta chauk


जळगाव, :- अजिंठा चौकात गेल्या चौदा दिवसांपासून परप्रांतीय मजुरांसाठी अन्नछत्र चालवले जात आहे. जळगाव शहरातील पहिला रुग्ण आढळलेल्या मेहरुण वासीयांनी अवघे दोनशे रुपयांच्या मदती पासून उभारलेल्या या अन्नछत्रात सकाळ-संध्याकाळ दहा हजार लोकांची भूक भागवली जात आहे. शहरातील विविध परिसरातून मसालेभात, पोहे, खिचडी, मिक्‍स व्हेज बिर्याणी असा मेनू आपल्या घराकडे परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांसाठी वाटप होत आहे. एक भांडे संपण्यापूर्वी दुसरे भांडे कोठूनतरी येते अन्‌ वाटपाचा सुरवात होते. महामार्गावरून जाणारी वाहने थांबवून त्यांना पिण्याचे गार व शुद्ध पाणी, औषधी आणि पोटाला जेवण देत जळगावकर आपुलकीची बिदाई देत आहे. 

शहरात 28 मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मेहरुण मध्ये आढळून आला. तत्पूर्वी आठवडा भरा पासून लॉकडाऊन मुळे संपूर्ण शहर आवश्‍यक सेवा वगळता गेली 50 दिवस बंद आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीला अनेक सामाजिक संस्थांना चहा-पाणी, ज्यूस आणि शिधा वाटपाचा उत्साह होता. हळूहळू हा उत्साह कमी होऊन चाळीस दिवसानंतर तेही बंद झाले. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्या नंतर गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, सौराष्ट्र, महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई,नाशिक आदी ठिकाणी उद्योगनगरीत कामावर असलेल्या मजुरांचे लोंढे पायीच आपल्या गावाकडे निघाले. हाताला काम नाही, घरात रेशन नाही, गाठचा पैसा संपलेला अशा अवस्थेत उपासमारीची वेळ आलेले हे कामगारांचे लोंढे महामार्गावरून वाहते झाले, सुरवातीला पोलिसांनी थांबवून त्यांना क्वारेन्टाइन केले, मात्र शासनानेच परवानगी दिल्यानंतर त्यात प्रचंड वाढ झाली आहे.दिवस भरात किमान 10 हजार मजुरांची वाहने अजिंठा चौकातून भुक भागवुन पुढच्या प्रवासाला निघत आहे.

पायपीट नाहीतर, सायकल-ट्रकचा आसरा 
अगदी लहानग्या मुलांना 44 अशं सेल्सिअस तापमानात ओढताण करतच आई-वडील नेतांनाचे चित्र महामार्गावर दिसू लागले आहे. काहींनी गावाहून पैसे मागवून नव्या सायकली खरेदी करून सायकलने दीड-दोन हजार मैलाचा प्रवास सुरू केला आहे. मोटारसायकल, रिक्षा इतकच नाही तर ट्रक मध्ये अक्षरश: कोम्बुन प्रवासाचा वाईट प्रसंग हजारो मजुरांवर ओढवला आहे. त्यांच्या वेदनांना फुंकर घालण्यासाठी जळगावकरांनी सुरु केलेले अन्न छत्र मायेची उब निर्माण करणारे ठरले आहे. 

वेदनांनी फोडला पाझर 
राष्ट्रीय महामार्गालगत मेहरुण येथील दोन-तीन रहिवाशांनी महामार्गावरून आपल्या गावाकडे परतणाऱ्यांच्या वेदना पाहून अजिंठा चौकात अवघ्या दोनशे रुपयांत बिस्कीट वाटपातून काम सुरू केले, संध्याकाळीच त्यांना भातासाठी तांदूळ मिळाले..एकेक करून ज्याला जे, शक्‍य होईल तो आणून देऊ लागला. एका महिलेने चक्क खिचडी सोबत चाळीस किलो लोणचं आणून ठेवले, तर फळविक्रेत्याने आपली पूर्ण गाडीच खाली केली. बघता-बघता शहरातील बागवान मोहल्ला,मेहरुण, सिंधी कॉलनी, अजिंठा हौसींग सोसायटी अशा विविध परिसरातून मोठाल्या डेग,भांडी भरून खिचडी, भात येत असल्याचे बघत वाटप करणाऱ्यांनाही उभारी आली, दिवसाला दोनशे बॅरल पिण्याचे पाणी आणि पाच हजार थंडपाण्याच्या बाटल्या येथे वाटप होऊ लागल्या. दिवसाला दहा डेग जेवण आणि रात्रभर वेगळी सोय या ठिकाणी होते. 

यांचा मदतीचा हातभार 
कुठलीही संस्था नाही,राजकीय पाठबळ नाही महामार्गाच्या कडेला रहिवासी असणारे बागवान फळविक्रेते, सर्वधर्मीय गॅरेज काम करणाऱ्या तरुणांनी मदतीत स्वत:ला झोकून दिले आहे.त्यात साजिद हुसैन शेख, अजिंठा हौसींग सोसायटीतील रहिवासी,मेहरुण अक्‍सानगरातील रहिवासी, धनराज कार डेकोर, रिम्पी सहानी, नजीर शेख,यासीन मुलतानी, हॉटेल संजय,बागवान बिरादरी,मुलतानी बांधव अशांनी हे अन्न छत्र उभे केले असून इंजिनिअर पाटील(पूर्ण नावही माहीत नाही),विक्रम फार्मसी अशा असंख्य मदतनीसांसहीत अन्नछत्र चालवले जात आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com