ओव्हर करतांना गॅसटॅंकरने चिरडले बांधकाम मजुराला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मे 2020

अपघातानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. मात्र, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना तब्बल चार तास कसोशीचे प्रयत्न करावे लागले. मृताच्या फुटलेला मोबाईल दुरुस्त केल्यानंतर त्याची ओळख पटली. कैलास हेमराज पवार (वय-35. रा.पिंप्राळा) असे मृताचे नाव असून अपघाताला कारणीभूत टॅंकर चालकाला अटक करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

 

सकाळ वृत्तसेवा 
जळगाव,:- राष्ट्रीय महामार्गावर शिवकॉलनी पुलावर सुसाट गॅस टॅंकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराचा टॅंकर खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना साडे अकरा वाजता घडली.

पाल(ता.रावेर) येथील मूळ रहिवासी कैलास हेमराज पवार (वय-35) बांधकाम कामगार असून उपजीविकेसाठी पत्नी दोन मुलांसह जळगावी स्थलांतरित झालेला आहे. पिंप्राळ्यातील मढी चौकात कैलास आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून सकाळी कामा निमित्त शहरात गेले होते. तेथून आपल्या दुचाकी क्र. (एमएच.19.यु.5130) ने घराकडे पिंप्राळा येथे परतत असताना समोर चालणाऱ्या गॅस टॅंकर क्र. (एम.एच.48.अे.वाय.4629)ला ओव्हर टेकच्या प्रयत्नात असताना टॅंकरचालकाने अचानक महामार्गावर त्याच्या पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी टॅंकरवळवत असताना मागून येत असलेल्या कैलास पवार दुचाकीसह मागील चाकात आल्याने चिरडले गेले. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले.रामानंदनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत करीत गॅसटॅंकर वरील चालक नामदेवराव जगन्नाथ चाटे(वय-39) याला ताब्यात घेतले. अमरावती येथून गुजरातकडे गॅस भरण्यासाठी हा टॅंकर जात असल्याचे चालकाने पोलिसांना माहिती दिली. 

मृतदेह नेण्यासाठी ऍम्बुलन्स येईना 
जळगाव शहरात अपघाती मृत्यू झाल्यानंतर मृतदेह उचलून नेण्यासाठी ऍम्बुलन्सची सोय नाहीच, शासकीय 108 ऍम्बुलन्स मधून चालक मृतदेह घेऊन जाण्यास नकार देतात. तर, जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाकडे शववाहिका उपलब्ध नाही. परिणामी अपघाती मृतदेह घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी पदरमोड करून खासगी वाहनातून मृतदेह उचलून न्यावा लागतो. आजही ऍम्बुलन्सला फोनवरून तासभर उलटल्यावर अखेर मालवाहू रिक्षातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. 

 

चिमुरड्यांचा पितृछत्र हरपले 
मोबाईलवरून त्याच्या सासऱ्यांना पाल येथे फोन लावून पोलिसांनी दु:खद बातमी कळवली, त्यानंतर पत्नी रेखा, मूल प्रवीण व शीतल अशा दोन लहानग्यांना घेऊन जिल्हारुग्णालयात दाखल झाली. मृतदेह पाहताच तिने प्रचंड आक्रोश केला. लॉकडाऊन मुळे गेली पन्नास दिवस हाताला कामनव्हते..परिणामी कुटुंबाच्या उदनिर्वाहसाठी कैलास यांचे प्रयत्न सुरू असताना अचानक कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने दोन मुलांसह आता कसे जगावे हा प्रश्‍न या कुटूंबासमोर आला असून वडिलांचा चेहरा देखील चिमुरड्यांना बघता आला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news;Gas tanker crushed construction worker while over